मुंबईच्या चिंतेत वाढ! तब्बल 8 हजार 63 नव्या रुग्णांची नोंद

64

देशभरासह मुंबईत पुन्हा एकदा कोरोना बाधितांमध्ये वाढ होताना दिसतेय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील रुग्णसंख्या 100 पर्यंत खाली घसरली होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतेय. आज मुंबईतील रुग्णसंख्येने तब्बल 8 हजारांचा टप्पा देखील पार केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात थोडा दिलासा मिळाला होता, मात्र आता पुन्हा आकडेवारी वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अशी आहे आजची स्थिती

मुंबईत आज 8 हजार 63 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आज एकाही मृत्यूची नोंद नाही. याशिवाय, 578 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 50 हजार 376 इतकी झाली आहे. दरम्यान, बरे झालेल्या रुग्णांचा दर 94 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 29 हजार 829 रुग्ण सक्रीय असून शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर 183 दिवसांवर पोहोचल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचा – मुंबई महापालिका सज्ज! आजपासून 9 केंद्रांवर बच्चे कंपनीला मिळणार लस)

दरम्यान, पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेनुसार उद्यापासून मुंबईमध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण झाली असून,  मुंबई आरोग्य विभागाकडून असे सांगण्यात आले आहे की, 9 केंद्रांवर सुरुवातीच्या टप्प्यात लहान मुलांच्या लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच लस घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला अर्धा तास वैद्यकीय तज्ज्ञाच्या निगराणीत ठेवण्यात येणार असून, त्याला काही त्रास जाणवल्यास त्याच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.