जगभरात कोरोनाचा कहर अद्याप सुरू असून कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रण आणण्यासाठी जगभरात कोरोना लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशा परिस्थितीत जगभरात कोरोना लसीच्या बूस्टर डोसची चर्चा सुरू असली तरी तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोस देणाऱ्या देशांबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते असे म्हणाले, ‘हा एक घोटाळा आहे, जो आता थांबला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. बूस्टर डोस देणं त्वरीत थांबवा, असे त्यांनी म्हटलं असून अनेक देशातल्या आरोग्य कर्मचारी आणि गरजू नागरिकांना पहिला डोस मिळाला नसताना रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेल्या नागरिकांना बूस्टर डोस देणं योग्य नाही, असे घेब्रेयेसस यांनी सांगितले आहे.
(हेही वाचा – पन्नास लाख इनामी नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा नेता ठार!)
दरम्यान, ज्या लोकांना कोरोना लसीची सर्वात जास्त गरज आहे त्यांना डोस मिळणे आवश्यक आहे. वाढत्या प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, देश निर्बंध आणि अधिक लस आणि बूस्टर कार्यक्रम लागू करण्याचा अवलंब करीत आहेत. मात्र, डब्ल्यूएचओकडून हे बूस्टर डोस देणं तात्काळ थांबवण्यास सांगितले जात आहे. त्याचबरोबर गरीब देशांना लस मिळेपर्यंत ही बंदी कायम ठेवण्याची चर्चा आहे. तर गरीब देशातील नागरिकांना रोज पहिला डोस दिला जातो, त्यापेक्षा सहा पट अधिक नागरिकांना बूस्टर डोस दिला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. अमेरिका, जर्मनी, कॅनडा, इस्रायलमध्ये बूस्टर डोस दिला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केलीय.
या देशांत बूस्टर डोस देणं युद्धपातळीवर
ऑगस्टमध्येही डब्ल्यूएचओने बूस्टर डोसवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या वर्षाच्या शेवटपर्यंत बंदी कायम ठेवण्याचे आवाहनही केले होते. मात्र जर्मनी, इस्रायल, कॅनडा आणि अमेरिकेने यास नकार दिला आहे. असे असतानाही या देशांमध्ये कोरोनाविरोधी बूस्टर डोस युद्धपातळीवर दिला जात आहे.
९२ देशांमध्ये बूस्टर डोस सुरू
विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने ९२ देशांमध्ये बूस्टर डोस सुरू केल्याची माहिती दिली आहे. मात्र यामध्ये एकाही गरीब देशाचा समावेश नाही. जगभरात दररोज २.८५ कोटी लसीचे डोस दिले जात आहेत. तर गरीब देशांमध्ये दररोज केवळ ११ लाख डोस दिले जात आहेत.