जम्मू-काश्मीरात पोलीस आणि सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तैय्यबाचा कमांडर मारला गेला. परप्रांतीय आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांसह अनेक घटनांमध्ये त्याचा सहभाग होता. निसार अहमद दार उर्फ मुसैब असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो कुलगामच्या रेडवानी बालचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सुरक्षा दलांकडून दिले प्रत्युत्तर
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनंतनाग जिल्ह्यातील सिरहामा गावात दहशतवादी असल्याच्या गुप्त माहितीवरून सुरक्षा दलांनी परिसराची घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. शोध पथके दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाजवळ पोहोचताच त्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. यात निसार अहमद दार ठार झाला. पोलिसांच्या नोंदीनुसार, मारला गेलेला दहशतवादी गेल्या वर्षी एप्रिलपासून सक्रिय होता. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) विजय कुमार यांनी सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाचे कौतुक केले आणि दहशतवाद्याचा खात्मा हे मोठे यश असल्याचे म्हटले.
(हेही वाचा – मुंबईतील मलतुंबई : १५ ते २० वर्षांत झाली नाही मलवाहिन्यांची सफाई)
दारूगोळा आणि गुन्हेगारी साहित्यही जप्त
यासंदर्भात आयजीपी विजय कुमार म्हणाले की, ठार झालेला दहशतवादी परप्रांतीय गैरमुस्लीम मजुरांच्या हत्यांमध्ये सहभागी होता. याशिवाय सुरक्षा दलांवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातही त्याचा हात होता. त्याच्यावर यापूर्वीही दहशतवादी कारवायांचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. निर्दोष तरुणांना दहशतवादी गटात सामील होण्यास प्रवृत्त करण्यातही दार यांचा मोठा हात होता. जेणेकरुन दहशतवादाचे पुनरुज्जीवन करता येईल. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून दारूगोळा आणि गुन्हेगारी साहित्यही जप्त केले.
Join Our WhatsApp Community