मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमधून येणाऱ्या जलवाहिनी टाकण्यासाठी ठाणे ग्रामीण भागातील अनेक जमिनी महापालिकेने अधिग्रहीत केल्या असल्या तरी जलवाहिनी टाकल्यानंतर ताब्यात घेतलेल्या या जमिनीवर संरक्षक भिंती नसल्याने मोठ्याप्रमाणात अतिक्रमण होऊ लागले आहे. जलवाहिनींच्या परिसरातील जमिनींवर होणाऱ्या या वाढत्या अतिक्रमणामुळे महापालिका हतबल झाली आहे. त्यामुळे हे वाढते अतिक्रमण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने आता या जागेचा तिन भागांमध्ये टोटल स्टेशन सर्वेक्षण करून त्यांचे उतारे मिळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही जमिन महापालिकेच्या नावावर चढवण्यासाठी तब्बल सुमारे दहा कोटी रुपये खर्च केला केला जाणार आहे.
( हेही वाचा : 7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! घर बांधण्यासाठी मिळणार तब्बल २५ लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण योजना)
मुंबईला दररोज तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा आणि भातसा या तलावांमधून दररोज ३८५० दशलक्ष लिटर अर्थात ३८५ कोटी लिटर एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. या तलावांमधून जलवाहिनी टाकण्यासाठी तसेच जलवाहिन्यांच्या बाजुने सेवा रस्ते बांधण्यासाठी महापालिकेने जमिन संपादित केली आहे. परंतु भूसंपादन केलेल्या जमिनीच्या जागेवर संरक्षक भिंत बांधून प्रत्यक्ष सीमांकन करण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या जमिनीची सीमा ओळखता येत नाही. त्यामुळे बहुतांश जलवाहिनी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून जातात. त्यामुळे सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात महापालिकेच्या जलवाहिन्या आणि सेवा रस्त्यांच्या बाजुने मोठ्याप्रमाणात वाढ होत असून याठिकाणी व्यावसायिक उपक्रमही वाढलेले आहे. महापालिकेने या जमिनीवर गॅरेज, छोटी छोटी दुकाने, झोपड्यांचे अतिक्रमण होत असून याशिवाय कचरा, गाळ,भंगार आणि घरगुती कचरा टाकला जातो. याठिकाणच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात नसून हे प्रमाण अधिकच वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिग्रहीत जमिनीचा मोठा भाग जमिन बळकावणाऱ्या भू माफियांमार्फत अतिक्रमित केली जावू शकते याची भीती महापालिकेला आता वाटू लागली आहे. त्यामुळे जलवाहिनींसह सेवा रस्ते बांधण्यासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनी महापालिकेच्या नावावर चढवण्याच्यादृष्टीकोनातून सर्व जमिनींचे टोटल स्टेशन सर्वे करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गुंदवली ते पोगाव, काल्हेर-गुंदवली आणि कशेळी- गुंदवली(दक्षिण कशेळी पुलापासून) आणि बाळकूम ते कोलशेत-बाळकूम ते दक्षिण कशेळी पूल या टोटल स्टेशन सर्व्हे आणि त्यांचे सात बाराचे उतारे मिळवण्यासाठी महापालिकेच्यावतीने तीन भागांमध्ये निविदा मागवली होती. या तिन्ही भागांसाठी प्रलिता इन्फ्राप्रोजेक्ट आणि अन्य दोन भागांतील कामांसाठी जेओबी इन्फ्रा या कंपन्या पात्र ठरल्या आहेत. पावसाळा धरून १२ महिन्यांमध्ये केला जाणार आहे.
जलवाहिन्यांभोवतीच्या जमिनींच्या टोटल स्टेशनसाठी होणारा खर्च आणि नियुक्त संस्था
गुंदवली ते पोगाव
- टोटल सर्वेसाठी पात्र ठरलेल्या संस्थेचे नाव : प्रलिता इन्फ्राप्रोजेक्ट
- कंत्राट किंमत : ३ कोटी ३५ लाख ७८ हजार
काल्हेर-गुंदवली आणि कशेळी- गुंदवली(दक्षिण कशेळी पुलापासून)
- टोटल सर्वेसाठी पात्र ठरलेल्या संस्थेचे नाव : जेओबी इन्फ्रा
- कंत्राट किंमत : ३ कोटी ५९ लाख ८६ हजार रुपये
बाळकूम ते कोलशेत-बाळकूम ते दक्षिण कशेळी पूल
- टोटल सर्वेसाठी पात्र ठरलेल्या संस्थेचे नाव : जेओबी इन्फ्रा
- कंत्राट किंमत : २ कोटी ३५ लाख २७ हजार रुपये