मुंबई उच्च न्यायालय म्हणतं, ‘महिलेच्या पायांना स्पर्श करणं म्हणजे विनयभंगच’

151

जालना जिल्ह्यातील परमेश्वर ढगे याला महिलेच्या विनयभंग प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दोषी करार देऊन, दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या निर्णयाविरोधात ढगे याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले. त्यावर सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती मुकुंद सेवलीकर यांनी मध्यरात्री महिलेच्या बेडवर बसून, तिच्या पायांना स्पर्श करणे म्हणजे विनयभंगच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

हे आहे प्रकरण 

पीडितेने 5 जुलै 2014 मध्ये एफआयआर नोंदवली होती. जुलै 4 च्या रात्री तिच्या शेजारी राहणारा परमेश्वर ढगे पीडितेच्या घरी आला आणि तिचा नवरा घरी नसल्याचा तसेच तो आजच्या रात्री घरी येणार नसल्याची खात्री करुन गेला. त्याच रात्री 11 वाजता ढगे महिलेच्या घरात शिरला आणि तिच्या बेडवर बसून तिच्या पायांना स्पर्श करु लागला. जाग येताच, पीडितेने आरडाओरड केली आणि घडला प्रकार आपल्या पतीला कळवला. दुस-या दिवशी पीडितेने एफआयआर दाखल केली. दरम्यान, ढगेने आपला पीडितेचा विनयभंग करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे सांगत बचाव करण्याचा प्रयत्न केला.

 ( हेही वाचा: मुंबईतील ९ लाख मुलांच्या लसीकरणासाठीही महापालिका सज्ज )

तर तो विनयभगंच

यावर न्यायमूर्ती सेवलीकर म्हणाले की, रेकाॅर्डवरील नोंदीनुसार ढगे याचे कृत्य हे महिलेच्या विनयशीलतेला धक्का पोहोचवणारे होते. रात्रीच्या वेळी महिलेच्या घरी जाण्याचे अन्य कोणतेही कारण नव्हते. तसेच घरी गेल्यावर पीडितेच्या बेड वर बसून तिच्या पायांना स्पर्श करणं, हे ढगे याचे वर्तन लैंगिक हेतूने होते. त्याशिवाय एवढ्या रात्री महिलेच्या घरी जाण्याचं कारण काय? या प्रश्नाचं स्पष्टीकरण ढगे याला समाधानकारक देता आले नाही. रात्रीच्या वेळी एखाद्या महिलेच्या शरीराच्या कोणत्याही भागाला तिच्या संमतीशिवाय स्पर्श करणे म्हणजे विनयभंगच होय, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे ढगे याने लैंगिक हेतूनेच शेजारील महिलेच्या घरी जाऊन, तिचा विनयभंग केला आहे. कनिष्ठ न्यायालयाने ढगेला दोषी ठरवण्यात कोणतीही चूक केलेली नाही, असे निरिक्षण खंडपीठाने नोंदवले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.