शिकावू, अनुभवी आणि निवृत्त परिचारिकांना महापालिकेत पुन्हा संधी : अशी आहे महापालिकेची ऑफर

153

मुंबई महानगरपालिकेत आरोग्य खात्याच्या वतीने राबविण्यात येणारे नियमित लसीकरण व विशेष लसीकरण मोहिमेसाठी कंत्राटी स्वरुपात लसटोचकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी वृत्तपत्र जाहिरात व बृहन्‍मुंबई महानगरपालिका संकेतस्‍थळावर देखील जाहिरात प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे. मान्‍यताप्राप्‍त परिचार्या शाळेतून स्‍टेट नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला सहायक परिचारिका प्रसविकेचा अभ्‍यासक्रम तथा जनरल नर्सिंग अधिक मिडवायफरी डिप्‍लोमाधारक असलेले उमेदवार पात्र ठरणार असून त्यांना प्रती लसीकरण सत्रासाठी ४५० रुपये दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे निवृत्‍त सार्वजनिक आरोग्‍य परिचारिका / सहायक आरोग्‍य प्रसविका यांनादेखील लसटोचक म्‍हणून या मोहिमेत सहभाग घेता येईल, असे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनांनुसार मुंबई महानगरपालिकेत आरोग्‍य केंद्र, दवाखाने, प्रसुतिगृहे हे सर्वसामान्‍य रुग्‍णालय व वैद्यकीय महाविद्यालयामार्फत नियमित लसीकरण कार्यक्रम मोफत राबविण्‍यात येतो. नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगट तसेच १० वर्ष, १६ वर्ष व गर्भवती महिलांचे लसीकरण करण्‍यात येते. आरोग्‍य केंद्रातील सहायक आरोग्‍य प्रसविकामार्फत आरोग्‍य केंद्रात व आरोग्‍य केंद्रातील कार्यक्षेत्रामध्‍ये क्षेत्रीय लसीकरण राबविण्‍यात येते.

सद्यस्थितीत ऑक्‍टोबर २०२२ पासून गोवर आजाराच्‍या रुग्‍णांची मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे. ही बाब लक्षात घेता नियमित लसीकरण तसेच क्षेत्रीय लसीकरण गतिमान करण्‍यासाठी व लसीकरणातून वंचित राहिलेल्यांचे गोवर लसीकरण करण्यासाठी, त्याचप्रमाणे गोवर रुग्ण अधिक असलेल्‍या भागातील आरोग्‍य केंद्रात विशेष लसीकरण मोहीम राबविण्‍यासाठी सर्व २४ विभागातील आरोग्‍य केंद्र स्‍तरावर लसटोचकाची कंत्राटी स्‍वरुपात कामगिरी तत्‍वावर नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी २१ डिसेंबर २०२२ रोजी वृत्तपत्र जाहिरात व बृहन्‍मुंबई महानगरपालिका संकेतस्‍थळावर देखील जाहिरात प्रसिद्ध करण्‍यात येत आहे.

पात्र उमेदवाराची आरोग्‍य केंद्र स्‍तरावर ताबडतोब नेमणूक करण्‍यात येईल. सद्यस्थितीत गोवर आजाराचे रुग्ण अधिक आढळत असल्‍याने लसीकरण गतिमान करण्‍यासाठी सर्व परिचारिकांनी लसटोचक म्‍हणून या मोहिमेत सहभाग घ्‍यावा,असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

निवडीचे निकष

  • शैक्षणिक पात्रता : मान्‍यताप्राप्‍त परिचार्या शाळेतून स्‍टेट नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला सहायक परिचारिका प्रसविकेचा अभ्‍यासक्रम / जनरल नर्सिंग अधिक मिडवायफरी डिप्‍लोमाधारक असलेले उमेदवार.
  • उमेदवाराची महाराष्‍ट्र नर्सिंग कौन्सिलमध्‍ये नावाची नोंदणी झाली असली पाहिजे.
  • वय – १८ वर्ष ते ६० वर्ष
  • मानधन – रुपये ४५० प्रती लसीकरण सत्र (किमान ४ तास)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.