मुंबई महापालिकेच्या प्रमुख खाते आणि विभागांच्या प्रमुख अभियंता पदावरील अधिकाऱ्यांची संक्रांतीच्या दिवशी खांदेपालट करण्यात आली. यात विकास व नियोजन विभागाच्या प्रमुख अभियंता पदावरील विनोद चिठोरे यांच्याकडे दक्षता विभागाची जबाबदारी सोपवत विकास नियोजन विभागाची जबाबदारी अतुल कुलकर्णी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर कोस्टल रोडची जबाबदारी चक्रधर कांडलकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता अशोक मिस्त्री यांच्यावर पाणी पुरवठा प्रकल्प याची जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई महापालिका विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांची प्रमुख अभियंता दक्षता एक खात्यात अचानक बदली करण्यात आली आहे. तर मुंबईसाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वप्न असलेल्या ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता पदावर चक्रधर कांडळकर उप प्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना पदोन्नतीने बढती देण्यात आली आहे.
(हेही वाचा – कुर्ला कसाईवाड्यात ‘गोमांस’ तस्करांचा पोलिसांवर हल्ला!)
या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या, बढत्या
- विनोद चिठोरे, प्रमुख अभियंता, विकास नियोजन यांची प्रमुख अभियंता, दक्षता पदावर बदली करण्यात आली आहे.
- अतुल कुलकर्णी, उपप्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना प्रमुख अभियंता, विकास नियोजन पदावर बढती देण्यात आली आहे.
- चक्रधर कांडलकर, उपप्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना कोस्टल रोड प्रमुख अभियंता पदी बढती देण्यात आली आहे.
- सतीश ठोसर, उपप्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना प्रमुख अभियंता पूल विभाग पदावर बढती देण्यात आली आहे.
- उल्हास महाले, उपप्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना प्रमुख अभियंता, रस्ते व वाहतूक या पदावर बढती देण्यात आली आहे.
- अशोक मिस्त्री, उपप्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना प्रमुख अभियंता, पाणी पुरवठा प्रकल्प या पदावर बढती देण्यात आली आहे.
- राजेश पाटगांवकर , उपप्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना प्रमुख अभियंता, नागरिक प्रशिक्षण संस्था व संस्कार केंद्र या पदावर बढती देण्यात आली आहे.
- अतुल पाटील, प्रमुख अभियंता, मलनि: सारण प्रकल्प यांना नगर अभियंता पदावर बढती दिली असून त्यांच्याकडे मलनि: सारण प्रकल्प खात्याचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आलेला आहे.