कारगिल विजय दिनी पंतप्रधानांसह मंत्र्यांनी केले वीरांना अभिवादन

युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशभरातून सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

90

भारतीय सेनेने कारगिल युद्धात मिळवलेल्या विजयाला 26 जुलै रोजी 22 वर्षे पूर्ण होत आहेत. या युद्धात हुतात्मा झालेल्या वीर योद्ध्यांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना देशभरातून सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि देशभरातील नेत्यांनी भारतमातेच्या वीर पुत्रांना अभिवादन केले.

राष्ट्रपतींचा कार्यक्रम रद्द

या विजय दिवसा निमित्त तिन्ही सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख असलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारी द्रासमधील कारगिल वॉर मेमोरियल येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार होते. मात्र खराब वातावरणामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रपती गुलमर्ग येथे जवानांशी संवाद साधणार आहेत.

आर्मीने दिला प्रेरणादायी संदेश 

या विजय दिनानिमित्त भारतीय सैन्याने आपल्या वीर जवानांचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच ट्विटरच्या माध्यमातून भारतीय सेनेकडून प्रेरणादायी संदेशही देण्यात आला आहे.

कारगिल की चोटियों पे
दुश्मनो को हमने झुकाया है
हिन्द के वीरों ने अपने लहू से
तिरंगे को फहराया है

लेखिका तमन्ना कुकरेती यांनी लिहिलेल्या या पंक्ती शेअर करत आर्मीने हुतात्म्यांना अभिवादन केले आहे.

(हेही वाचाः कारगिल विजय दिवसः भारतीय सेनेने आवळल्या भ्याड पाकड्यांच्या नाड्या)

बलिदान सदैव प्रेरणादायी राहील- पंतप्रधान मोदी

कारगिल विजय दिवसा निमित्त आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी कारगिलमध्ये प्राणांचे बलिदान देणा-या सर्व वीरांना श्रद्धांजली वाहत, त्यांचे शौर्य आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या वर्षी दिलेल्या मन की बात मधील संदेशही पुन्हा एकदा दिला आहे. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 15 ऑगस्ट 1999 रोजी देशाला दिलेल्या मंत्राचा या मन की बात मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. आपण उचलत असलेले पाऊल कारगिलच्या दुर्गम भागात प्राणांची आहुती देणा-या हुतात्म्यांसाठी सन्मानपूर्वक आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारण्याची गरज असल्याचे वाजपेयींनी त्यावेळी म्हटले होते.

संरक्षण मंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

दिल्लीतील नॅशनल वॉर मेमोरियल येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय सेनेच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाला नमन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

अमित शहांनी व्यक्त केली कृतज्ञता 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजय दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सैनिकांचे साहस, बलिदान आणि पराक्रमामुळे कारगिलवर विजयी तिरंगा फडकला. देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी वीर जवानांनी दिलेले योगदान कृतज्ञ भारत कधीही विसरणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.