टीआरपी घोटाळ्याचा मास्टरमाईंड पार्थो दासगुप्ताला जामीन 

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली असून त्यातील मुख्य आरोपी हा पार्थो दासगुप्ता आहे. 

मागील वर्षी उघडकीस आलेल्या टीआरपी घोटाळ्यातील मुख्य आरोपी पार्थो दासगुप्ता याला मुंबई उच्च न्यायालयाने दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी तब्बल १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

आधी तक्रारदार नंतर निघाला सूत्रधार! 

टीआरपी घोटाळा उघडकीस आला, तेव्हा आधी याप्रकरणात तक्रारदार बार्क या संघटनेचे अधिकारीच होते, मात्र त्यानंतर तेच या घोटाळ्यात सहभागी असल्याचे समोर आले. त्यात बार्कचे सर्वेसर्वा पार्थो दासगुप्ता हा मुख्य सूत्रधार होता, असे चौकशीतून उघडकीस आले. त्यामुळे २४ डिसेंबर २०२० रोजी गुप्ताला अटक करण्यात आली होती. पार्थो दासगुप्ता हा बार्कचा 2013 ते 2019 या काळात सीईओ होता. एका ठराविक चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी पार्थोने त्या चॅनेलकडून वेगवेगळ्या प्रकारे फायदा उठवला होता. त्यांच्याकडून पैसे ही घेतले होते. यामुळे पार्थोला अटक झाली होती.

(हेही वाचा : स्वा. सावरकरांसाठी साधं एक ट्वीटही नाही, संभाजीनगरचाही पडला मुख्यमंत्र्यांना विसर- फडणवीस!)

या 15 जणांना अटक

या घोटाळ्याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये विशाल वेद भंडारी, बोंम्पेल्लीराव नारायण मिस्त्री, शिरीष सतीश पट्टण शेट्टी, नारायण नंदकिशोर शर्मा, विनय राजेंद्र त्रिपाठी, उमेश चंद्रकांत मिश्रा, रामजी दुधनाथ शर्मा, दिनेश पन्नालाल विषवकर्मा, हरीश कमलाकर पाटील, अभिषेक कोलवडे, आशिष अबीदूर चौधरी, घनश्याम सिंग, विकास खांचंदाणी, रोमिल, पार्थो दासगुप्ता यांचा समावेश आहे.

टीआरपीचे काय महत्व? 

टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट. यावरुन प्रेक्षक कोणती वाहिनी अधिक पाहतात हे मोजले जाते. कोणती मालिका किंवा वृत्तवाहिनी सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंगला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here