२००३ मध्ये ‘लिओना स्विडेक्सी’या अमेरिकन मॉडेलची हत्या झाली होती, या हत्येच्या तपासात त्रुटी राहून गेल्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची वर्षभराने निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. तब्बल १९ वर्षांनी पुन्हा या गुन्ह्याची फाईल उघडण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास मिरा-भाईंदर पोलिसांनी सुरू केला आहे. या तपासासाठी नेमण्यात आलेले खास पथक या अमेरिकन मॉडेलच्या खुनाचे सत्य उलगडण्यासाठी परदेशात म्हणजे युरोपमध्ये जाणार आहे.
( हेही वाचा : जे.जे.रुग्णालयात द्वारसभा; महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे खाजगीकरणाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन)
लिओना स्वीडेक्सी (३३) या अमेरिकन मॉडेलचा मृतदेह ८ फेब्रुवारी २००३ मध्ये मिरा रोड येथील काशीमीरा पोलिसांना घोडबंदर रोडच्या कडेला विवस्त्र अवस्थेत आढळून आला होता. लिओना ही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा भारतीय पती प्रग्नेश देसाई याने सहारा पोलीस ठाण्यात दाखल केली होती असे काशीमिरा पोलिसांच्या चौकशीत समोर आले व लिओनाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले होते. लिओना हिची हत्या करून तिचा मृतदेह मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या कडेला फेकण्यात आला होता.
काशीमीरा पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार यांनी या लिओना स्वीडेक्सी हिच्या हत्येचा तपास सुरू केला असता लिओना ही अमेरिकन मॉडेल असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी तिचा भारतीय पती प्रग्नेश देसाई आणि त्याचा मित्र विपुल पटेल यांना बडोदा येथून ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता प्राथमिक तपासात प्रग्नेशने त्याचा मित्र विपुलच्या मदतीने लिओनाची हत्या करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून हे दोघे बडोदा येथे निघून गेले होते. प्रग्नेश देसाई हा अनिवासी भारतीय असून त्याने लिओना हिची हत्या करून तिच्या विम्याचे १ दशलक्ष डॉलर लाटण्यासाठी हत्या केल्याचे त्यावेळी तपासात निष्पन्न झाले होते. काशीमीरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी पोलीस उपनिरीक्षक राजेश पवार यांच्या कडून तपास काढून स्वतःकडे घेतला होता.
तपासात त्रुटी आणि आरोपी निर्दोष …
अमेरिकन मॉडेल लिओनाच्या हत्येप्रकरणी तिचा पती अनिवासी भारतीय प्रग्नेश देसाई आणि त्याचा मित्र विपुल पटेल या दोघांना अटक करण्यात आली तसेच इतर दोन आरोपी फरार होते. हा खटला न्यायालयात सुरू होता व तपासात त्रुटी राहिल्यामुळे प्रग्नेश देसाई आणि विपुल पटेल या दोघांची वर्षभरात निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या निकालामुळे अमेरिकेत तीव्र पडसाद उमटले होते.
१९ वर्षांनी नव्याने तपास, सत्य बाहेर येणार …
लिओना हिच्या आरोपीची निर्दोष मुक्तता झाल्याची अमेरिकन सरकारने गंभीर दखल घेतली होती, मिरा भाईंदर पोलिसांनी या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना दोन्ही आरोपी गैरहजर रहात होते. त्यामुळे खटल्यात प्रगती होत नव्हती. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी या प्रकरणात लक्ष घालून दोन्ही आरोपींना शोधून हजर करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रग्नेश देसाई हा बडोद्यामध्ये असल्याचे समजल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. मात्र विपुल पटेल हा इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्याचे समजले. आयुक्त दाते यांनी याप्रकरणी इंटरपोटलची मदत घेतली आणि विपुल पटेलचा शोध सुरू झाला. चेझ रिपब्लिक येथील प्राग शहरातील विमानतळावर इंटरपोलच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया मागील ४ महिन्यांपासून सुरू होती. ती पूर्ण झाली असून त्याला ताब्यात घेण्यासाठी मिरा भाईंदर पोलिसांचे एक विशेष पथक शनिवारी चेझ रिपब्लिक मधील प्राग शहरात जाणार आहे. युरोपातून विपुलला आणल्यानंतर अन्य दोन फरार आरोपींवर नव्याने आरोपपत्र दाखल करून हा खटला चालवला जाणार आहे. आरोपीचा ताबा घेण्यासाठी मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील चार अधिकारी युरोपला जाणार असून त्यात पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि काशीमीरा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community