पुरस्कार घेण्यासाठी दिल्लीला यायला पैसे नाहीत, पोस्टाने पाठवा! हे आहे पद्मश्री पुरस्कार विजेत्या कवीच्या पोस्टमागील सत्य

सोशल मीडिया आणि त्यावर फिरणारे व्हायरल मेसेज हे आता आपल्या रुटिनचा भाग झाले आहेत. या मेसेजमधले सगळेच नसले तरी बरेचसे व्हायरल मेसेज हे समाजविरोधी व्हायरल इन्फेक्शन पसरवणारे असतात. यामुळे अनेकदा फसवणूक, खोटी माहिती यांसारखे आजार पसरण्याची भीती असते. पण हे मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासणे देखील तितकेच महत्वाचे आहे कारण यामुळे खूप मोठे गैरसमज पसरण्याची शक्यता असते.

विख्यात कवी पद्मश्री हलधर नाग यांच्याबाबत अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नाग यांना त्यांनी केलेल्या साहित्यातील कार्याबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे पद्मश्री पुरस्कार स्विकारण्यासाठी दिल्लीला जाण्याइतके सुद्धा पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी पद्मश्री पुरस्कार पोस्टाने पाठवण्याची विनंती सरकारला केली होती. असे या व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे. ही पोस्ट 6 वर्षांनी पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागल्यामुळे आता त्यामागचे सत्य समोर येत आहे.

व्हायरल मेसेज खोटा

कोसली भाषेतील कवी हलधर नाग हे मुळचे ओडिशाचे रहिवासी आहेत. त्यांनी केलेल्या साहित्यसेवेसाठी त्यांना 2016 साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले. पण त्यावेळी आपल्याकडे पैसे नसल्यामुळे नाग यांनी पद्मश्री पोस्टाने पाठवावा, अशी मागणी केली असल्याची गोष्ट ही खोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.

पद्मश्री पुरस्कार मिळण्यापूर्वी हलधर नाग यांना ओडिशा सरकारकडून कलाकार भत्ता दिला जात होता. तसेच ओडिशा सरकारने त्यांना जमिन देखील दिली असून त्यावर त्यांना एका डॉक्टरने घर देखील बांधून दिले आहे. नाग यांना सरकारकडून मासिक 18 हजार 500 रुपये भत्ता मिळत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

नाग यांनी व्यक्त केले दुःख

सोशल मीडियावरील या खोट्या पोस्टबाबत नाग यांनी याआधीदेखील स्पष्टीकरण दिले आहे. पद्मश्री पुरस्कार स्विकारण्यासाठी त्यांना केंद्र सरकारकडून सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यांना गाडीने रायपूरला नेऊन तिथून विमानाने दिल्लीत नेण्यात आले आणि तिथे एका हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची उत्तम सोय करण्यात आली होती, असे हलधर नाग यांनी स्पष्ट केले आहे. या व्हायरल पोस्टमुळे आपण फार दुःखी झाल्याचेही नाग यांनी त्यावेळी म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here