मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमधील रुग्णांसह डॉक्टरांचे कपडे आता अत्याधुनिक पध्दतीने धुण्यासाठी टनेल लाँड्रीचा वापर केला जाणार आहे. मात्र, रुग्ण आणि डॉक्टरांचे कपडे अत्याधुनिक पध्दतीने धुवून निर्जंतूक केले जाणार असले तरी टनेल लाँड्री ही शिवडीतील क्षय रोग रुग्णालयाच्या आवारात बसवली जाणार आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार म्हणून ओळखला जात असून या रुग्णालयाच्या आवारात प्रत्येक जण आपली स्वत:ची काळजी घेत असतो. परंतु त्याच आवारात जिथे रुग्णांचे आणि डॉक्टरांचे कपडे निर्जंतूक असायला हवेत, तिथे अशाप्रकारच्या टनेल लाँड्रीमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात घालण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरु आहे.
( हेही वाचा : कोकणात काळ्या बिबट्याचे दर्शन )
टनेल लाँड्रीचा वापर करण्याची घोषणा
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सन २०२२-२३च्या अर्थसंकल्पात रुग्णांसह डॉक्टरांचे कपडे अधिकाधिक निर्जंतूक करण्यासाठी अत्याधुनिक पध्दतीच्या टनेल लाँड्रीचा वापर करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने यासाठी निविदाची सुरु आहे.
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी परळ येथे एक धुलाई केंद्र आहे. याठिकाणी ५० टक्केच कपडे धुण्याची क्षमता असून उर्वरीत ५० टक्के कपडे हे खासगी धुलाई केंद्रात धुवून घेतले जातात. त्यामुळे अत्याधुनिक टनेल लाँड्री बसवण्यासाठी निवडलेल्या जागेबाबतच आता वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये शंका उपस्थित केली जात आहे. रुग्णांचे व डॉक्टरांच्या कपड्यामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. परंतु ही लाँड्रीच संसर्गजन्य आजार असलेल्या क्षयरोग रुग्णालयाच्या आवारात बसवली जात असल्याने डॉक्टरांकडूनही संसर्गाबाबत भीती वर्तवली जात आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इतर कोणत्याही रुग्णालयाच्या आवारात अशाप्रकारे टनेल लाँड्री बसवल्यास कोणत्याही प्रकारची शंका असण्याचे कारण नाही. परंतु क्षय रोग रुग्णालयाचा आवारात जर कपडे धुवून सुकवताना यातून संसर्ग झाल्यास किंबहुना ते निर्जंतूक न झाल्यास त्यापासून होणाऱ्या संसर्गाला जबाबदार कोण असा सवाल करण्यात येत आहे.
परवानगी न घेता लाँड्री बसवण्याचा निर्णय
विशेष म्हणजे हे रुग्णालय महापालिका आरोग्य विभागाच्या अखत्यारित येत असून यांत्रिक व विद्युत विभागाने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता किंबहुना त्याचे दुष्परिणाम लक्षात न घेता लाँड्री बसवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांचे तसेच रुग्णांचे कपडे धुण्यासाठी टनेल लाँड्री बसवण्यासाठी अस्तित्वातील परळमधील धुलाई केंद्राची जागा आणि नवीन जागा म्हणून क्षयरोग रुग्णालयाच्या आवारातील जागा अशा दोन जागा निश्चित करण्यात आली. या दोन्ही जागांपैंकी एक जागा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या धुलाई केंद्राच्या जागेवर जर टनेल लाँड्री बसवता येणार नसेल तर नवीन जागेचा अर्थांत क्षयरोग रुग्णालयातील जागेचा विचार केला जाईल. त्यामुळे अद्याप जागा निश्चित करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण या दोन्ही जागा यापूर्वीच मंजूर करण्यात आल्या होत्या,असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community