ऋजुता लुकतुके
एलॉन मस्क यांनी ट्विटरवर काही अर्थविषयक सेवा (Twitter Financial Service) देण्याची तयारी सुरू केली आहे. २०२४ सालच्या शेवटी या सेवा कार्यान्वित होतील असा अंदाज आहे. तुमचे आर्थिक व्यवहारांचं नियोजन करणारी ही सेवा असेल असं बोललं जात आहे.
स्वत: मस्क यांनी ट्विटरची अर्थविषयक सेवा सुरू झाल्यावर तुम्हाला बँकेची गरज पडणार नाही, या भाषेत या सेवेचं वर्णन केलं आहे. द व्हर्ज या अमेरिकन नियतकालिकाने याविषयीची बातमी पहिल्यांदा दिली आहे. मस्क यांनी ट्विटर कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलचा हवाला या लेखात देण्यात आला आहे.
‘काही महत्त्वाचे परवाने मिळाले की, ५-६ महिन्यातच आपल्या कंपनीने आर्थिक क्षेत्रात शिरकाव केलेला असेल,’ असं मस्क यांनी या ईमेलमध्ये लिहिलं आहे. सुरुवातीला अमेरिकेत सर्व ठिकाणी पैसे हस्तांतरित करण्याची सोय ट्विटर उपलब्ध करून देणार आहे.
द व्हर्ज या नियतकालिकाला एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीचा ऑडिओ उपलब्ध झाला आहे. आणि यात मस्क म्हणतात, ‘मी ज्याला पेमेंट म्हणतो, ते म्हणजे एखाद्याचं अख्खं अर्थविश्वच आहे. जिथे जिथे पैशाचा उल्लेख होतो, ते सगळं ट्विटरवर मिळालं पाहिजे. पैसा असो किंवा सेक्युरिटी. फक्त मित्राला २० डॉलर पाठवले, किंवा त्याच्याकडून घेतले, इतकंच आपल्याला अपेक्षित नाही. तर पुढे लोकांना बँक खातंच लागू नये इतकी मजल आपल्याला मारायची आहे.’
मस्क यांना यापूर्वी अर्थक्षेत्रातील फिनटेक कंपनी (Twitter Financial Service) चालवण्याचा अनुभव आहे. ते सुरुवातीला पेपाल होल्डिंग्ज या कंपनीचे संस्थापक होते. तिथे डेव्हिड सॅक्स आणि त्यांनी मिळून अर्थविषयक अनेक सेवांच्या उभारणीला सुरुवात केली होती. तेव्हाच्या अनुभवाचा उल्लेखही मस्क यांनी ट्विटरच्या कर्मचाऱ्यांशी बोलताना केला.
‘जुलै २०२० मध्ये आमच्याकडे पेपालच्या पुढील दिशेचा आराखडा तयार होता. पेपाल ईबे झाल्यानंतर त्यांनी आमच्या निम्म्या योजनाही राबवल्या नाहीत. उलट काही मागेही घेतल्या. खरंतर अर्थविषयक सेवांचं भविष्य वेगळंच आहे. फिनटेक कंपन्यांचं आधुनिकीकरण गरजेचं आहे. तेच आपल्याला ट्विटरमध्ये करायचं आहे,’ असं मस्क इथं म्हणताना दिसतात.
ट्विटरचा ताबा मिळवल्यावर मस्क यांची पुढील वाटचाल याच दिशेनं सुरू झाली होती. ही सोशल मीडिया साईट वीचॅट सारखी चालवण्याबद्दल त्यांनी अनेकदा उघडपणे बोलून दाखवलं होतं. तर कंपनीच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत अलीकडेच ट्विटर ॲपवर फिनटेक सेवा (Twitter Financial Service) सुरू करण्याविषयी सुतोवाच केलं होतं. अर्थात, निदान सुरुवातीला या सेवा फक्त अमेरिकेपुरत्याच मर्यादित असतील.
Join Our WhatsApp Community