नाशिक येथे दिनांक 3 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत कुसुमाग्रज नगरीत 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू असून आज अखेरचा दिवस आहे. धक्कादायक म्हणजे आज शेवटच्या दिवशी संमेलनाच्या प्रवेशद्वारावर आता कोरोनाने शिरकाव केला आहे. साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळ रॅपिड टेस्टमध्ये दोन जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना साहित्य संमेलनात प्रवेश नाकारण्यात असून त्यांना परत पुण्याला पाठवण्यात आले आहे. या दोन कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे.
दोघं पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ
अडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या साहित्य संमेलनाची आज सांगता होणार आहे. मात्र आज अखेरच्या दिवशी या संमेलनात पुण्याहून आलेल्या दोन प्रकाशकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे दोघं पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
(हेही वाचा – ‘साहित्य संमेलनाला खूप शुभेच्छा पण तेथे जाऊन तरी काय करायचे?’)
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वारावर रॅपिड कोरोना टेस्ट केल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे. नेहमीप्रमाणे आजही ही चाचणी करून साहित्य प्रेमींना प्रवेश दिला जात आहे. नियमित तपासणी सुरू असताना दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संमेलन समितीकडून सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले आहे.
समंलेन परिसरात पोलीस बंदोबस्त
दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागे ही घटना घडली असून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून ही शाई फेक करण्यात आली आहे. गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या या घटनेनंतर विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे समंलेन परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गिरीश कुबेर हे आज साहित्य संमेलनात एका परिसंवादात सहभागी होणार होते. या परिसंवादात सहभागी होण्याआधीच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Join Our WhatsApp Community