मध्यप्रदेशात 2 लढाऊ विमाने कोसळली, तर राजस्थानमध्ये चार्टर्ड विमानाला अपघात

मध्यप्रदेशातील मुरैना येथे शनिवारी सकाळी भारतीय वायुसेनेची सुखोई-30 आणि मिराज-2000 ही दोन लढाऊ विमाने कोसळल्याची घटना घडली. प्रशिक्षण सरावादरम्यान हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या घटनेबाबत संरक्षणमंत्र्यांनी हवाई दल प्रमुखांशी चर्चा केली. अशाच प्रकारची घटना राजस्थानातील भरतपूर येथे घडली. याठिकाणी सुद्धा एक चार्टर्ड प्लेन क्रॅश झाले आहे.

( हेही वाचा : कल्याण-डोंबिवली ते नवी मुंबई अंतर होणार कमी! प्रवासाच्या वेळेत बचत, नागरिकांना दिलासा )

दोन्ही पायलट सुखरूप

यासंदर्भात माहिती देताना मुरैनाचे जिल्हाधिकारी म्हणाले की, जेट विमान पहाटे साडेपाच वाजता कोसळले. दोन्ही पायलट सुखरूप बाहेर पडले. या अपघातानंतर हवाई दलाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे. दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली की आणखी काही कारणामुळे अपघात झाला याची चौकशी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातादरम्यान सुखोई 30 मध्ये दोन पायलट होते तर मिराज 2000 मध्ये एक पायलट होता. दोन पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे तर हवाई दलाचे हेलिकॉप्टर तिसऱ्या पायलटच्या ठिकाणी पोहोचले आहे.

राजस्थानमध्ये चार्टर्ड विमानाला अपघात

अशाचप्रकारची घटना राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात घडली. याठिकाणी शनिवारी सकाळी चार्टर्ड विमान कोसळले. भरतपूरचे जिल्हाधिकारी अशोक रंजन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भरतपूरच्या उचैन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे विमान हवाई दलाचे आहे की लष्कराचे हे अद्याप निश्चित झालेले नाही. दुसरीकडे भरतपूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, सध्या हे लहान विमान असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजून स्पष्टता नाही. त्याचा आकाशातच स्फोट झाला होता. कोणाचा मृत्यू झाला आहे की नाही याबाबत चौकशीनंतरच बोलता येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here