बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी परिक्षेत्रातील साईबंगोड्यात शुक्रवारी तब्बल १३ तास वनविभागाने सर्व अतिक्रमण हटवले. दारुभट्ट्यांचा अड्डा म्हणून ओळखल्या जाणा-या या भागांत अतिक्रमण तोडताना वनविभागाने दोन दारुभट्ट्या तोडल्या. या दोन्ही दारुभट्ट्यांमध्ये दारुनिर्मितीचे काम सुरु नव्हते, असे कारवाईदरम्यान निदर्शनात आले. याआधीही साईबंगोड्यात अवैधरित्या दारुभट्ट्यांमधून मुंबई नजीकच्या परिसरात दारु विकली जात असल्याचे समोर आले होते.
जंगलात सापडल्या दारुभट्ट्या pic.twitter.com/0nSV6Y2W1f
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) May 20, 2022
( हेही वाचा : मध्य रेल्वेवर रात्री, तर हार्बर रेल्वे मार्गावर दिवसा मेगाब्लॉक!)
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील साईबंगोडा, उलटनपाडा, मरोशीपाड्यातील झोपड्या तोडायला वनविभागाने पोलिस, राज्य राखीव पोलिस दल अशी मोठी टीम तयार करुन कारवाईला सुरुवात केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह नजीकच्या ठाणे विभागातील प्रादेशिक आणि वन्यजीव विभागाचे वनाधिकारी, कांदळवन कक्षाचे वनाधिकारी, शहापूर, डहाणू विभागातील वनाधिकारी कारवाईसाठी हजर होते. घटनास्थळी ३०० पोलिस, २१० वनाधिकारी, १०० कामगारांचा समावेश होता. ७ जेसीबी आणि दोन डंपर्सच्या मदतीने झोपड्या तोडल्या गेल्या. झोपड्यांमधील सामान डंपर्सच्या मदतीने जंगलाबाहेर ठेवले गेले. जंगलाच्या आतमध्येही वनविभागाची टीम पहारा ठेवण्यासाठी होती. संतापलेल्या जमावाने जंगलात वणवा लावू नये, यासाठी खबरदारी घेतली गेली. साईबंगोड्यातील दोन दारुभट्टया वनविभागाने तातडीने जेसीबीच्या मदतीने नष्ट केल्या. परंतु त्यामागे कोण होते, हे समजू शकले नाही.
वन्यजीवांना त्रास
अतिक्रमणग्रस्त भागांमुळे जंगलातील अतिसंरक्षित भागांतून नजीकच्या तुळशी तलावात पाणी पिण्यासाठी जाणा-या वन्यप्राण्यांना त्रास होत होता. वनविभागाने जंगलात बिबट्याच्या मोजणीसाठी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वन्यजीवांना पाणी पिण्यासाठी तुळशी तलावाचा रस्ता मानवी अतिक्रमणामुळे बाधित होत असल्याचे निरीक्षण वनविभागाने नोंदवले होते.
Join Our WhatsApp Community