जलप्रदूषणामुळे ठाणे खाडीची वाताहात! रामसर स्थळ जाहीर करण्याच्या निकषाला धक्का

158
ठाणे खाडीला देशातील पहिल्या शहरी भागातील पाणथळ जागेला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला. मात्र तिन्ही बाजूने डपिंग ग्राउंडने वेढलेल्या ठाणे खाडीत पूर्वीप्रमाणे जलचर आढळत नसल्याने रामसर स्थळाचे निकष पूर्ण होत नसल्याचा दावा पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी केला. देवनार, कांजूरमार्ग तसेच कोपरी येथील डांपिंग ग्राउंड आता तातडीने ठाणे खाडीपासून दूर हटवा किंवा जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी कांदळवन कक्षाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यावरणप्रेमीनी केली. रामसर स्थळ जाहीर करण्यापूर्वी रामसर कनव्हेन्शन टीमने ठाणे खाडीला भेट देणे आवश्यक होते, असा मुद्दाही उपस्थित होत आहे.
IMG 20220815 WA0017

जलचरांचा अधिवास नष्ट 

ठाणे खाडीत उल्हास नदीचा मोठा भूभाग आहे. उल्हास नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित आहे. नागरी वसाहती आणि कारखान्यांमधील सांडपाण्यामुळे उल्हास नदीचे प्रदूषण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईतील देवनार आणि कांजूरमार्ग येथील दोन्ही डम्पिंग ग्राउंड ठाणे खाडीच्या दक्षिण टोकाला लागून बांधले गेले आहेत. त्यातील कचरा खाडीच्या पात्रातील खारफुटीमध्ये अडकतो. ठाण्यातील कोपरी डांपिंग ग्राउंडच्या कचऱ्याचा गाळही खारफुटीमध्येच अडकतो, परिणामी प्रजननासाठी आणि अंडे घालण्यासाठी येणाऱ्या माशांनी ठाणे खाडीतील खारफुटीकडे पाठ फिरवली.
‘वनशक्ती’ या पर्यावरणप्रेमी संस्थेचे सदस्य नंदकुमार पवार यांनी ठाणे खाडीतील वाढत्या जलप्रदूषणामुळे स्थानिक मच्छिमारांचा मासेमारीचा व्यवसाय जवळपास बंदच झाल्याची माहिती दिली. चाळीस वर्षांपूर्वी ठाणे खाडीत सहज मासे मिळायचे. पाण्यातील ऑक्सिजनची मात्रा संपल्याने ठाणे खाडीतील माशांच्या प्रजाती संपल्या आहेत. ठाणे खाडीला जलप्रदूषणाच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी तातडीने कार्यवाही करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

रामसर स्थळ जाहीर करणाऱ्या या दोन निकषांची पायमल्ली

1) पाणथळ जागेत जलचरांच्या अधिवासासाठी अनुकूल वातावरण असणे
2) माशासाठी अन्नाचा स्रोत असणे. माशांना अंडी घालण्यासाठी संबंधित अधिवास सुस्थितीत असणे.

नष्ट झालेल्या माशांच्या प्रजाती 

  • जिताडा,
  • करपाल ( कोळंबीची प्रजाती ),
  • खेकड्यांच्या असंख्य प्रजाती,
  • करकरी,
  • वडा,
  • घावी,
  • निवटी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.