गोरेगाव येथील आरेमध्ये युनिट क्रमांक १५ येथून दोन बिबट्यांना एकाच दिवशी वनाधिका-यांनी जेरबंद केले. मंगळवारी पहाटे दीड तर सकाळी साडेनऊच्या सुमारास दुसरा बिबट्या जेरबंद झाला. दोन्ही बिबटे युनिट क्रमांक १५मध्ये लावलेल्या पिंज-यात जेरबंद झाले. या बिबट्यांची शारीरिक तपासणी सुरु असून त्यानंतर तपशील दिला जाईल अशी माहिती ठाणे वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांनी दिली. दिवाळीत चिमुरडीवर झालेल्या हल्ल्यानंतर आतापर्यंत आरेतून चार बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत.
( हेही वाचा : अफझलखानाचा कोथळा काढल्याच्या प्रसंगाचा पुतळा प्रतापगडावर उभारण्याच्या मागणीची दखल)
दिवाळीच्या पहिल्या दिवशी आरेतील युनिट क्रमांक १५ येथील इतिका लोट या दीड वर्षाच्या मुलीवर बिबट्याचा हल्ला झाला. या हल्ल्यात इतिकाचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २६ आणि ३० ऑक्टोबर रोजी दोन वेगवेगळे बिबटे पकडले गेले. दोघांनी लहान मुलीवर हल्ला केला नसल्याचे कॅमेरा ट्रेपच्या माध्यमातून दिसून आले. हल्लेखोर मादी बिबट्या असून, ती कॅमेरा ट्रेपच्या माध्यमातून आरेत राहणारी अंदाजे साडेतीन वर्षांची मादी बिबट्या असल्याचे बोलले जात आहे. जेरबंद केलेल्या दोन्ही बिबट्यांपैकी ३० ऑक्टोबर रोजी पकडलेल्या बिबट्याला तातडीने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले तर २६ ऑक्टोबर रोजी पकडलेला सी५५ हा नर बिबट्याला गेल्या आठवड्यात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दिवाळीनंतर आरेत बिबट्याने पुन्हा दोनदा हल्ला केला. युनिट क्रमांक १५ येथील तबेल्याबाहेर उभा असलेल्या माणसाला बिबट्याने नख मारुन पळ काढला तर शुक्रवारी आदर्शनगर येथील एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला.
बिबट्याच्या तीन हल्ल्यानंतर मंगळवारी दिवसाच्या पहिल्या प्रहारातच दोन बिबटे पकडले गेले. दोघांची ओळख पटलेली नसून, त्यापैकी एक मादी बिबट्या असल्याचे ठाणे वनविभाग (प्रादेशिक)चे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community