शाहरुख खानच्या बंगल्यात शिरले दोन संशयित; फॅन असल्याचा दावा

सुपरस्टार अमिताभ बच्चन,ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटके पेरल्याच्या नागपूर येथील ११२ या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला आलेल्या एका निनावी फोनने मुंबईत खळबळ उडवून दिलेली असतानाच शुक्रवारी सकाळी दोन संशयितांना बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्याच्या आत संशयितरित्या फिरताना अटक करण्यात आली आहे.

मन्नत बंगल्याची कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून हे दोघे बंगल्याच्या पाठीमागील भिंतीवरून बंगल्यात शिरले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हे दोघे स्वतःला शाहरुख खानचे चाहते असल्याचे सांगत असून गुजरात राज्यातून शाहरुख खान याला भेटण्यासाठी आलो होतो असा दावा करीत आहेत . वांद्रे पोलिसांनी या दोघांविरुद्ध ट्रेस पासिंग (बेकायदेशीररित्या प्रवेश करणे) चा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे कळू शकलेली नसून दोघे जण २२ ते २५ वयोगटातील तरुण असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी सकाळी हे दोघे शाहरुख खान यांच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्याच्या आतमध्ये संशयितरित्या फिरत असताना सुरक्षा रक्षकांना आढळून आले. त्यांनी या दोघांना हटकले असता दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा रक्षकांनी या दोघांना पकडून वांद्रे पोलिसांच्या स्वाधीन केले.

( हेही वाचा: राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना आता दुप्पट अनुदान मिळणार )

पोलिसांनी या दोघांकडे कसून चौकशी केली असता “आम्ही शाहरुख खानचे चाहते आहोत, असा दावा हे दोघे करीत असून गुजरात राज्यातून आलो असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. शाहरुखला भेटण्यासाठी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेलो मात्र तेथून सुरक्षा रक्षकांनी हाकलून लावले. त्यानंतर बंगल्यात जाण्यासाठी मार्ग शोधत आम्ही दोघे बंगल्याच्या पाठीमागे आलो व बंगल्याची भिंत चढून बंगल्याच्या आत शिरलो, बंगल्याच्या आत शाहरुखला शोधत असताना आम्हाला सुरक्षा रक्षकांनी बघितले म्हणून आम्ही पळण्याचा प्रयत्न केला अशी माहिती हे दोघे देत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु बंगल्यात चोरून प्रवेश करण्यामागे या दोघांचा नक्की उद्देश काय होता? तसेच हे दोघे सांगत असलेली माहिती खरी आहे का याची शहानिशा सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी प्राथमिक तपासावरून वांद्रे पोलिसांनी या दोघांविरुद्ध ट्रेस पासिंग (बेकायदेशीररित्या प्रवेश करणे) चा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here