देशातील अव्वल दहा सरकारी शाळांमध्ये ‘या’ शाळांचा समावेश

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस शाळा आणि पूनमनगर सीबीएसई शाळा यांचा देशातील अव्वल दहा सरकारी शाळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. एज्युकेशन वर्ल्ड इंडिया या शिक्षण क्षेत्राशी निगडित संकेतस्थळाने देशभरातील सरकारी शाळांचे ऑनलाईन सर्वेक्षण करुन ही यादी जाहीर केली आहे. या यशाबद्दल मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे आदी मान्यवरांनी या शाळांचे कौतुक केले आहे.

‘या’ मुद्यांचा सर्वेक्षणात समावेश

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस शाळा व मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळा अशा या दोन शाळा ‘एज्युकेशन वर्ल्ड स्कूल रँकिंग ऑफ गव्हर्नमेंट स्कूल्स इन इंडिया – सन २०२१-२०२२ या उपक्रमांतर्गत ऑगस्ट २०२१ मध्ये आयोजित सर्वेक्षणामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यासाठी या शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. शिक्षकांचा अध्यापन दर्जा व क्षमता, शाळा इमारत, भौतिक सुविधा, अध्यापन कृती, विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी उपक्रम, सह-शालेय उपक्रम, ऑनलाईन पद्धतीने अध्यापन, मुख्याध्यापक नेतृत्व गुण, पालकांचा सहभाग या सर्व मुद्यांचा सर्वेक्षणामध्ये समावेश होता.

जागतिक स्तरावर सन्मान

सर्वेक्षणामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर विविध शाळांची सखोल परिक्षणांती निवड करण्यात आली. त्यामध्ये मुंबई पब्लिक स्कूल वरळी सी फेस मनपा शाळेस राज्यस्तरीय प्रथम क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर पाचव्या क्रमांकाने मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच मुंबई पब्लिक स्कूल पूनमनगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळेस राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक व राष्ट्रीय स्तरावर दहावे मानांकन प्राप्त झाले आहे.

दरम्यान, हवामान कृती आराखड्यासाठीदेखील सप्टेंबर २०२१ मध्ये या शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. या अनुषंगाने  शाळांनी या उपक्रमावर काम करण्यास सुरुवात केली. जागतिक व राष्ट्रीय स्तरावर हवामान बदलाबाबत सुरु असलेल्या प्रकल्पाची माहिती घेऊन, विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच या हवामान बदल उपक्रमामध्ये कार्यरत असलेल्या किंवा सहभागी असलेल्या परदेशांतील विविध शाळांशी संपर्क करून उपक्रम व प्रकल्पांबाबत माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. या सर्व उपक्रमांसाठी एकूण ३ आठवडे एवढा कालावधी होता. या उपक्रमांमध्ये जागतिक स्तरावर सहभागी शाळांपैकी सीबीएसई हरियाली व्हिलेज व सीबीएसई काणे नगर शाळांची निवड झाली असून, त्यांचा जागतिक स्तरावर सन्मान करण्यात आला आहे. मुंबई पब्लिक स्कूल अजीजबाग व मुंबई पब्लिक स्कूल पूनम नगर सीबीएसई अभ्यासक्रम शाळा अशा या दोन शाळांनाही यामध्ये सहभागी झाल्याबाबत गौरविण्यात आले आहे.

 ( हेही वाचा : होय, २०१४ सालीच मला खरे स्वातंत्र्य मिळाले! विक्रम गोखले यांचा पुनरुच्चार )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here