अखेर तीन महिन्यानंतर मुंबईतील गोवरची संख्या आटोक्यात येत आहे. मुंबईतील अंधेरी आणि मालाडमध्ये गेल्या २८ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २८ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळला नाही, तर संबंधित भाग गोवरमुक्त जाहीर केला जातो. या नियमानुसार पालिका आरोग्य विभागाने शुक्रवारी, 6 जानेवारी रोजी अंधेरी आणि मालाड हा भाग आता गोवरमुक्त झाल्याचे जाहीर केले.
एल वॉर्डातील चुन्नाभट्टी येथेही रुग्ण संख्या वाढत
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीतील सर्वोदय नगर आणि मालाडमधील आप्पापाडा आरोग्य केंद्र आता बंद करण्यात आले आहे. मुंबईतील आता गोवर उद्रेकांची संख्या आता ७६ पर्यंत आल्याचेही सांगण्यात आले. गोवर उद्रेकाचा हॉटस्पॉट असलेल्या गोवंडीतही रुग्णसंख्या कमी होत आहे. गोवंडी खालोखाल एल वॉर्डात दरम्यानच्या काळात रुग्ण संख्या कमी होत होती. गेल्या आठवड्यापासून एल वॉर्डातील चुन्नाभट्टी येथेही रुग्ण संख्या वाढत आहे. चुनाभट्टी येथील बंजारा समाजाच्या मुलांना लसीकरणासाठी तयार करणे अद्यापही आव्हानात्मक असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली.
(हेही वाचा ‘वक्फ बोर्डा’ची लपवाछपवी; कारभार संकेतस्थळावर उघड करण्याची मागणी)