मुंबईतल्या ‘या’ दोन्ही वाघीणींची आई बनण्याची संधी हुकली

106

वन्यजीवांमध्ये मातृत्व ही भावना पिल्लू किंवा बछडा जन्म झाल्यानंतर नैसर्गिकरित्या येतेच असे नाही. कित्येकदा मातृत्व लाभूनही वाघीणींना आईपण अनुभवता येत नाही. ताणात आल्याने किंवा नवजात बछड्याच्या सुरक्षिततेविषयी शंका आल्यानंतरही वाघीण आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बछड्याला मारुन टाकते. असाच प्रकार भायखळ्यातील राणीबागेत घडला. मात्र महिनोनमहिने या प्रकाराचा थांगपत्ताही राणीबागेने लागू दिला नाही. मुंबईकरांना कित्येक वर्षांनी मुंबईकर वाघीण देणा-या करिष्मा या सात वर्षांच्या वाघीणीने दुस-यांदा मातृत्व अनुभवताना चक्क आपल्या नवजात बछड्यालाच मारुन टाकले. या घटनाक्रमाला काही महिने सरल्यानंतर बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील श्रीवल्ली या साडेतीन वर्षांच्या वाघीणीला वनाधिका-यांनी गर्भवती असल्याचा अंदाज बांधला. तीन महिन्यांहून अधिक काळ सरल्यानंतर अखेर श्रीवल्ली गर्भवती नसल्याने सलग दुस-यांदा वनाधिका-यांची वाघीण गर्भवती असल्याच्या केवळ अंदाजप्रपंचातून फजिती झाली.

कर्मचा-यांनी कटाक्षाने दाबण्याचा प्रयत्न केला

कोरोनाकाळापूर्वी मुंबईतील राणीबागेत आलेल्या करिष्मा या वाघीणीने १४ नोव्हेंबर रोजी वाघीणीला जन्म दिला. कित्येक वर्षानंतर राणीबागेत पाळणा हलला. मोठ्या थाटामाटात नव्या वाघीणीला वीरा असे नाव दिले गेले. वीरा मोठी होत असताना शक्ती आणि करिष्मा या वाघाच्या जोडीचे मिलन पुन्हा बहरले. या मिलनातून करिष्मा पुन्हा गर्भवती राहिली. परंतु त्यानंतर करिष्माला काही महिन्यांपूर्वी बछडाही झाला. वाघीण वर्षाकाळाला तीनवेळा गर्भवती राहते. अगोदर जन्मलेल्या बछड्यांच्या पालनपोषणात मात्र तिचा कटाक्ष असतो. करिष्माकडून दुस-यांदा राणीबागेत पाळणा हलला. परंतु तिने आपल्या जन्मलेल्या बछड्यालाच मारुन टाकले. हा प्रकार कर्मचा-यांनी कटाक्षाने दाबण्याचा प्रयत्न केला मात्र याबाबतीतील चर्चा सर्वदूर पसरली. याबाबत राणीबागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांना संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

veera tiger
वीरा आणि करिष्माचा फोटो

(हेही वाचा होळीबाबत ‘गुगल’चे पंचांग चुकले…)

राणी बाग प्रशासन दुस-यांदा तोंडावर आपटले

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने पाच वर्षांपूर्वी बिजली ही वाघीण गर्भवती असल्याचे जाहीर केले होते. उद्यानात ब-याच वर्षानंतर पाळणा हालत असल्याने वनाधिका-यांनी मिठाईही वाटली. तीन महिन्यांहून अधिक काळ सरला तरीही बिजलीला प्रसूतीकळा आल्याच नाहीत. अखेरच्या क्षणापर्यंत वनाधिकारी बिजलीच्या वाढलेल्या पोटाकडेच पाहत राहिले, अखेर बिजली जाडी झाल्याचा हास्यास्पद निष्कर्ष वनाधिका-यांनी मांडला. बिजलीची शेवटपर्यंत गर्भारपणाची वैद्यकीय तपासणी न झाल्याने पशुवैद्यकीय अधिका-यांसह संपूर्ण उद्यानावर अखेर बिजली गर्भवती नसल्याचे सांगण्याची नामुष्की ओढावली. यंदाच्या वर्षांत विदर्भातून उद्यानात आलेल्या श्रीवल्ली या वाघीणीला उद्यानात बाजीराव साथीदार मिळाला. दोघेही एकत्र राहू लागल्यानंतर कालांतराने श्रीवल्लीने साथीदाराकडे पाहणेही नाकारले. श्रीवल्ली गर्भवती असल्याने ती साथीदारासोबत मिलन करत नसल्याचा अंदाज वनाधिका-यांनी बांधला. श्रीवल्लीचीही गर्भवती असल्याची वैद्यकीय तपासणी केली गेली नाही. प्रसूतीकाळ जवळ येताच वनाधिका-यांनी श्रीवल्लीला वेगळ्या पिंज-यात ठेवले. तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही लावले. श्रीवल्लीचे दर्शन पर्यटकांसाठी बंद झाले. अखेरीस ऑक्टोबर महिन्याच्या शेवटचा दिवस सरल्यानंतर श्रीवल्लीही गर्भवती नसल्याचे सिद्ध झाल्याने उद्यान प्रशासन पुन्हा तोंडावर आपटले. आता दुस-यांदा जाहीरात देऊनही उद्यानात नवा पशुवैद्यकीय अधिकारी येणार का, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.