देशाच्या सरन्यायाधीशपदी उदय लळित यांची नियुक्ती

132

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून उदय उमेश लळित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नियुक्ती पत्रावर स्वाक्षरी करत लळित यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे लळित हे भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून पदग्रहण करणार आहेत.

राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब

सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे रमण्णा यांच्या निवृत्तीनंतर उदय लळित सरन्यायाधीश पदाची धुरा हाती घेणार आहेत. मुख्य म्हणजे बार असोसिएशन मधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात नियुक्ती झालेले लळित हे दुसरे सरन्यायाधीश ठरले आहेत. याआधी 1964 मध्ये एस.एम.सिक्री यांची सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात नियुक्ती करण्यात आली होती.

कोण आहेत लळित?

उदय लळित हे मूळचे महाराष्ट्राचे असून त्यांचे मूळ गाव कोकणात आहे. त्यांच्या परिवारात न्यायाधीश होण्याची परंपरा आहे. त्यांचे वडील उमेश लळित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले होते. न्यायमूर्ती लळित यांनी वकिलीची सनद मिळवल्यानंतर मुंबईतील ज्येष्ठ वकील एम.ए.राणे यांच्याकडे त्यानंतर दिल्लीतील ज्येष्ठ विधीज्ञ सोली सोराबजी यांचे सहायक म्हणून काम केले होते. 1983 मध्ये बार असोसिएशनचे सदस्यत्व मिळाल्यानंतर त्यांनी 1986 पासून सर्वोच्च न्यायालयात स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली.

एप्रिल 2004 मध्ये लळित यांना सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून नामांकित करण्यात आले. त्यानंतर 13 ऑगस्ट 2014 रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट 2017 मध्ये पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने तिहेरी तलाक असंवैधानिक घोषित केला होता. या निकालात न्यायमूर्ती लळित यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.