मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात संरक्षक भिंत उभारण्याचे आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ग्रामस्थांना दिले. कारण, पावसाळा कधीही सुरु होईल, अशी स्थिती असतानाही परशुराम घाटाचे काम मात्र अवघे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात हा घाट मृत्यूचा सापळा बनेल, अशी स्थिती आहे.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. महिनाभर दुपारचे सहा तास परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवून चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे घाट खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महामार्ग विभागाने या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी संरक्षक भिंत बांधण्यासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद केली नसल्याचे पत्राद्वारे परशुराम ग्रामस्थांना कळविले. यामुळे पेढे व परशुराम गावामधील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
( हेही वाचा : कितीही दावे झाले तरी निकालानंतरच कळणार अपक्षांची साथ कोणाला?)
मात्र कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही, संरक्षक भिंतीच्या कामासाठी अंदाजे दहा कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशा सूचना आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाला तातडीने देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री सामंत यांनी ग्रामस्थांना दिली आहे.