एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद नकोय, शिवसेनाप्रमुखपद हवंय

127

राजकारण हे गजकरण असतं असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधी काळी म्हटलं होतं. पण पुढे ते स्वतः रजकारणात सक्रिय झाले. त्यांची सत्ता देखील आली. गेली ३० वर्षे तर मुंबई महानगरपालिकेवर त्यांची सत्ता राहिलेली आहे. बाळासाहेबांची एक ख्याती होती, त्यांनी कोणतंच संवैधानिक पद घेतलं नव्हतं. त्याचं कारण अगदी स्पष्ट आहे, कोणताही ठाकरे ते पद एकतर व्यवस्थित सांभाळू शकत नाही आणि एकदा का ते पद स्वीकारलं तर पक्षप्रमुख पद धोक्यात येऊ शकतं.

म्हणून संवैधानिक पद स्वीकारण्याऐवजी त्यांनी शिवसेनाप्रमुख म्हणून अमर्याद सत्ता राबवली. उद्धव ठाकरे हे काही बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाले असं म्हणता येणार नाही. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब व विशेषतः आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेले शिवसौनिक आहेत. त्यामुळे त्यांना शिवसेना पक्षाच्या समस्या आणि सकारात्मक व नकारात्मक बाजू सगळं काही माहिती आहे.

याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा होता

आता शिंदेंनी बंड केल्यामुळे काही कॉन्स्पिरेन्सी थिअरीज रचल्या जात आहेत की हे बंड उद्धव ठाकरेंनीच घडवून आणलंय. जर शिंदेंकडे बहुमत आहे तर ते का लपून बसलेत, समोर का येत नाहीत? सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जर केवळ सरकार पाडायचं असेल तर ते कधीही पाडता येतं. सरकार पाडणे ही काही दुर्मिळ गोष्ट नाही.

ज्या एकनाथ शिंदे यांचा अपमान सो कॉल्ड चाणक्याने केला आणि आपल्या पक्षप्रमुखांना सांगूनही त्या स्वयंघोषित चाणक्यावर कोणतीच कारवाई केली गेली नाही. त्यात ठाणे महानगरपालिका देखील महाविकासआघाडी म्हणून लढणार आहे. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निर्विवाद सत्ता धोक्यात आणण्याचं काम राष्ट्रवादीकडून होत होतं आणि याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा होता.

सध्या उद्धव ठाकरे व त्यांचा गट शरद पवारांना पूर्णपणे शरण गेलेला आहे. पवार जे करतील ती पूर्व दिशा. कारण ठाकरेंचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पवारांनी पूर्ण केलं आहे. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत पवारांना विरोध करु शकत नाहीत. भाजपाने ठरवलं तर एका दिवसात ते सत्तेला आव्हान देऊन सत्ता पाडू शकतात. पण मग शिंदे यांना जे हवंय ते सहजासहजी मिळणार नाही.

शिंदेंच्या गटाकडून हळूहळू एकेक गोष्टी बाहेर कढल्या जात आहेत. आमदारांचे एकेक व्हिडिओ बाहेर येत आहेत, ज्यात ते उद्धव ठाकरेंना भावूक साद घालून तक्रार करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंच्या गटाकडून बंडखोर आमदारांना शिव्या दिल्या जात आहेत, त्यांच्या घरच्यांना धमकी दिली जात आहे, कार्यालये फोडले जात आहेत, पण शिंदे गटाकडून कोणत्याही अर्वाच्च भाषेचा वापर केला जात नाही. शिंदे सर्व शिवसैनिकांना दाखवून देत आहेत की नेता कसा असावा.

शिंदे हे एकनाथ नसून लोकनाथ

उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही शिंदेंना खूप काही दिलं. आम्ही म्हणजे ’ठाकरे.’ हा परिवारवाद आहे. त्यात ते शिंदेंना व इतर आमदारांवर केलेले उपकार बोलून दाखवत आहेत. पण शिंदे गटाकडून मात्र असा प्रतिवाद करण्यात आला की, आम्हाला काय मिळालं हे महत्वाचं नसून जनतेला काय मिळतंय, सर्वसामनय शिवसैनिकाला काय मिळतंय हे महत्वाचं आहे. दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांनी अनेक मुद्दे संयमीपणे मांडलेले आहेत. यावरुन एकनाथ शिंदे किती समजूतदार आहेत आणि ते सामान्य जनतेसाठी कसे धावून जातात, हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरुन उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व स्वार्थी आहे आणि शिंदे हे एकनाथ नसून लोकनाथ आहेत असं दिसून येईल.

उद्धव ठाकरे आणि पवारांना असं वाटतंय की आपण वेळखाऊपणा करतोय. पण शिंदे ते होऊ देत आहेत, हे त्यांच्या ध्यानीमनी सुद्धा नाही. एकनाथ शिंदेंचा अपमान व खच्चीकरण झाल्यानंतर केवळ सरकार पाडणे हा संकुचित हेतू ठेवून त्यांनी एवढं मोठं बंड केलं आहे असं ज्यांना वाटतं ते अजूनही बालवाडीत आहेत. शिंदेंच्या ठाण्यातील सत्तेला उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीतर्फे चॅलेन्ज केलं होतं. आता शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदालाच चॅलेन्ज केलेलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.