सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान असे काय घडले? ज्यामुळे गंभीर वातावरणात पिकला हशा

145

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. यावेळी ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. पहिल्या दिवशी, मंगळवारी सिब्बल यांनी राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी झालेली निवड चुकीची असल्याचा दावा केला होता. बुधवारी सिब्बल यांनी अनेक मुद्दे उपस्थितीत केले. घटनात्मक तरतुदींना कसा हरताळा फासला गेला हे सिब्बल न्यायालयात पटवून देत होते. यावेळेस न्यायालयात गंभीर वातावरण होते, मात्र या शांत वातावरणात असे काही झाले, ज्यामुळे एकच हशा पिकला.

काय घडले?

सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम. आर. शाह, कृष्णा मुरारी, हिमा कोहली, पी. नरसिंह या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरुवात झाली. मंगळवारी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्यामुळे बुधवारी सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. जेवणाची वेळ जवळ आली तरीही सिब्बल यांचा युक्तिवाद सुरुच होता.

यादरम्यान न्यायालयातील कक्षात उपस्थित असलेले शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरून त्यांना गरम होत असल्याचे सरन्यायाधीशांना दिसून आले. त्यांनी लगेचच सिब्बल यांना युक्तिवाद थांबवण्यास सांगितला आणि सिंग यांना म्हणाले की, ‘न्यायालयातील कक्षात गरम होतय असे तुम्ही एकटेच व्यक्ती नाही. आपण एसी सुरू करू. मात्र तुम्हाला वातावरणामुळे गरम होतय की सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे?’

(हेही वाचा – जुन्या विधानसभा अध्यक्षांना पुन्हा नियुक्त करा, ठाकरे गटाची मागणी; वाचा आतापर्यंतचा युक्तिवाद)

सरन्यायाधीशांच्या या मिश्किल टिप्पणीने न्यायालयातील गंभीर वातावरणात हशा पिकला. यावर कपिल सिब्बल स्मितहास्य करत म्हणाले की, सरन्यायाधीश तुमचीच कृपा. तर सिंग यांनी सरन्यायाधीशांच्या हजरजबाबीपणाची दाद दिली आणि स्मितहास्य केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.