नवी मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करून सुमारे ३६२.५ कोटी रुपये किमतीचे हेरॉईन पनवेल येथून जप्त केले आहे. हा सर्व अमली पदार्थाचा साठा दुबई येथून आला होता, नवी मुंबई मार्गे पंजाब राज्यात जाणार होता, अशी माहिती समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. दोन दिवसांपूर्वी एवढ्याच किमतीचा ड्रग्स साठा गुजरातच्या मुंद्रा बंदर या ठिकाणी जप्त करण्यात आला होता. हा दोन्ही ड्रग्सचा साठा पंजाब राज्यात जाणार होता, अशी माहिती समोर येत आहे.
ड्रग्सचे १६८ पाकिटे मिळाली
दुबईतून नवी मुंबई पनवेल या ठिकाणी असलेल्या न्हावा शेवा बंदर, आजीवली येथील नवकार लॉजिस्टीक या ठिकाणी मागील ७ महिन्यांपूर्वी दुबईहून आलेले एक कंटेनर पडून आहे, त्याच्यावर दावा करण्यासाठी कोणीही आलेले नसल्याची माहिती पंजाब पोलिसांकडून नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. नवी मुंबई पोलिसांनी एक पथक तयार करून पनवेल येथे पाठवले, मात्र त्या ठिकाणी हजारो कंटेनरमधून हा कंटेनर कसा शोधून काढायचा, असा प्रश्न पोलिसांना पडला होता.
नवी मुंबई पोलीस पथकाने या हजारो कंटेनरमधून काही संशयित कंटेनर निवडून त्याची तपासणी केली असता, एका कंटेनरमध्ये ड्रग्स ठेवण्यासाठी कप्पे तयार करण्यात आले होते. पोलिसांनी या कंटेनरचे कप्पे शोधले असता त्यात सुमारे ७२.१५८ किलो ड्रग्सचे १६८ पाकिटे मिळाली.
नवी मुंबईमार्गे पंजाब राज्यात जाणार होते
हे ड्रग्स तपासले असता ते हेरॉईन असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ३६२.५ कोटी रुपये किमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे ड्रग्स मागील ७ महिन्यांपूर्वी दुबईतून नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरात आले होते, मात्र या कंटेनरमधील माल सोडवण्यासाठी कोणीच आलेले नाही. दुबईहून आलेले हे ड्रग्स नवी मुंबईमार्गे पंजाब राज्यात जाणार होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या मुंद्रा बंदर या ठिकाणी देखील एवढ्याच किमतीचा ड्रग्स मिळाला होता व दोन्ही कंटेनरमधील ड्रग्स हा पंजाब राज्यात पाठविण्यात येणार होता, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community