ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अवघ्या 45 दिवसांत ट्रस यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यामुळे ब्रिटनमधील सत्तानाट्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. ट्रस यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली आहे.
नव्या पंतप्रधान पदासाठी शर्यत
ब्रिटनमध्ये पक्षांतर्गत बंडखोरी वाढल्यामुळे ट्रस यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण त्याआधीच ट्रस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी पुन्हा एकदा संघर्ष पेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ब्रिटनमधील खासदार ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होऊ शकतात असे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः भारतीय असूनही भारताविरोधी वक्तव्य करणा-या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा)
ट्रस यांची घोषणा
ज्या आश्वासनांसाठी मी लढा देत होते ती आश्वासनं मी पूर्ण करू शकेन असे मला सध्याची परिस्थिती पाहता वाटत नाही. त्यामुळेच मी माझ्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देत आहे. ज्यावेळी मी या पदाचा कार्यभार हाती घेतला तेव्हा देशात आर्थिक स्थैर्य नव्हते. आम्ही देशातले कर कमी करण्याचे स्वप्न पाहिले होते. पण ते सध्यातरी पूर्ण होईल असे वाटत नसल्यामुळे मी माझे पद सोडत आहे,अशी घोषणा लिझ ट्रस यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे.
Join Our WhatsApp Community