पत्नीच्या अंत्यविधीसाठी जाऊ दिले नाही म्हणून त्याने…

मालकाकडे पत्नीच्या अंत्यविधीसाठी जाण्यासाठी सुट्टी आणि रोख रक्कम मागितली होती. मात्र मालकाने त्याला पैसे आणि सुट्टी देण्यास नकार दिला. त्यामुळे...

69

पत्नीच्या अंत्यविधीसाठी जाऊ दिले नाही म्हणून त्याने मालकाला अद्दल घडवण्यासाठी, चक्क घरातील लाखो रुपयांच्या दागिन्यांसह पोबारा केला होता. पोलिसांनी या नोकरासह दोघांना बिहार राज्यातून अटक केली आहे. कांदिवली पश्चिम या ठिकाणी ही चोरीची घटना गेल्या महिन्यात घडली होती.

काय आहे प्रकरण?

अनिल यादव असे या चोरी करणा-या नोकराचे नाव असून, श्यामसुंदर यादव हा त्याचा सहकारी आहे. श्यामसुंदर यादव याच्यावर कांदिवली पश्चिम येथील एका वयोवृद्ध दाम्पत्याचा सांभाळ करण्याची जवाबदारी होती. श्यामसुंदर यादव याच्या भावाचे लग्न असल्यामुळे गावी गेला होता, जाण्यापूर्वी त्याने अनिल यादव याला बदलीवर ठेवले होते. एप्रिल महिन्यात अनिल यादव याच्या पत्नीचे गावी अचानक निधन झाल्याचे कळताच, त्याने मालकाकडे पत्नीच्या अंत्यविधीसाठी जाण्यासाठी सुट्टी आणि रोख रक्कम मागितली होती. मात्र मालकाने त्याला पैसे आणि सुट्टी देण्यास नकार दिला. त्यामुळे अनिल यादवला काय करावे हे सूचत नव्हते.

(हेही वाचाः राज्यात कोरोना रुग्ण संख्या घटते, तरी नवीन जिल्ह्यांत लॉकडाऊनची घोषणा! )

दागदागिने घेऊन पोबारा

अखेर २८ एप्रिल रोजी रात्री घरातील वृद्ध दाम्पत्य झोपी गेले असता, अनिल यादवने घरातील दागदागिने आणि रोख रक्कम असा एकूण साडेसात लाख रुपयांच्या ऐवजासह पोबारा केला होता. या दाम्पत्याची मुलगी अंधेरी येथे राहण्यास आहे. ती २९ एप्रिल रोजी आई-वडिलांना भेटायला घरी आली असता, घरात चोरी झाल्याचे आणि नोकर अनिल यादव हा फरार असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने ताबडतोब कांदिवली पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी केली अटक

कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन, आरोपीचा शोध घेत बिहार येथून अनिल यादव आणि श्यामसुंदर यादव या दोघांना अटक करुन मुंबईत आणले. पत्नीच्या मृत्यूनंतर देखील मालक अंत्यविधीला जाऊ देत नाही, म्हणून त्याने श्यामसुंदरला फोन करुन सांगितले होते. श्यामसुंदर याने अनिल यादव याला चोरीचा सल्ला देऊन गावी पळून येण्यास सांगितले होते, अशी माहिती पोलिसांना अनिल यादवने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.