राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए आणि अंमलबजावणी संचलनालय(ईडी) या दोन्ही केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर अंडरवर्ल्ड डॉन आणि त्याचे साम्राज्य आले आहे. एनआयएने अंडरवर्ल्ड विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर अंडरवर्ल्ड संबंधी आर्थिक गैरव्यवहारचे प्रकार समोर आले. त्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून मंगळवारी पहाटे पासून दाऊदची बहीण हसीना पारकर हिचे नागपाड्यातील घर आणि दाऊदच्या इतर सहकाऱ्यांच्या घरी छापेमारी सुरू केली होती.
तब्बल ६ तासांच्या या छापेमारी नंतर ईडीच्या हाती अंडरवर्ल्डचे आर्थिक गैरव्यवहार संबंधी काही महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. दरम्यान कुख्यात गँगस्टर छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट याला ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले आहे.
(हेही वाचाः सरकार पाडण्यासाठी ईडीच्या धाडी! संजय राऊतांचा आरोप)
ईडीची छापेमारी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बेकायदेशीर कृत्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने महिन्याच्या सुरुवातीला गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या यंत्रणेच्या तपासात खंडणी, बेकायदेशीर कृत्य,हवाला मार्फत झालेले बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, मनी ट्रेल समोर आले आहे. याप्रकरणी आता ईडीने देखील डी कंपनी विरोधात शस्त्र उपसले असून, ईडीने मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान डी कंपनीशी संबंधित व्यक्तीवर आपले लक्ष केंद्रित करून ठिकठिकाणी छापेमारी सुरु केली आहे.
१० ठिकाणी छापेमारी
मंगळवारी पहाटे पाच वाजताच ईडीच्या ७० अधिकाऱ्यांच्या विविध पथकांनी डी कंपनीशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींची कार्यालये, घरे अशा एकूण १० ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या नागपाड्यातील घराचा देखील समावेश आहे. दरम्यान ईडीने छोटा शकील याचा मेव्हणा सलिम कुरेशी उर्फ सलिम फ्रुट याच्या घरी छापेमारी केली असून, सलिम फ्रुटला चौकशीसाठी ताब्यत घेण्यात आले आहे.
(हेही वाचाः मुंबईत ‘ईडी’चं ‘सर्च’ऑपरेशन, दाऊदशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी; एका मंत्र्याचीही चौकशी)
ईडीच्या हाती लागले पुरावे
या छापेमारी दरम्यान ईडीच्या हाती काही महत्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. या कागदपत्रांमध्ये दाऊदच्या साम्राज्याची माहिती, तसेच हवालामार्फत झालेले आर्थिक व्यवहार यांसंबधी माहिती असल्याचे समजते. सुमारे सहा तास सुरू असलेली छापेमारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास थांबवण्यात आली असून, छापेमारीत सापडलेले पुरावे आणि सलिम फ्रुट याला ताब्यात घेऊन ईडीचे अधिकारी कार्यालयांत दाखल झाले होते.
डी-कंपनीची पाळेमुळे बाहेर येणार
सलीम फ्रुट यांच्याकडे चौकशी सुरू असून, त्याला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडी आणि एनआयए या दोन्ही केंद्रीय तपास यंत्रणेने डी कंपनीच्या गळ्याभोवती आवळलेल्या फासामुळे लवकरच दाऊदची भारतातील पाळेमुळे बाहेर पडण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community