आगामी 2022-23 आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल करन्सी लागू होणार आहे. मागील काही महिन्यांपासून डिजिटल चलनाबाबत चर्चा सुरू होती. त्यासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज, मंगळवारी अर्थसंकल्पीय भाषणात शिक्कामोर्तब केले.
क्रिप्टोच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर 30% कर
आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामण यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेद्वारे डिजिटल चलन सुरू केल्याने अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. आरबीआय कडून 2022-23 मध्ये ब्लॉकचेन आधारीत डिजिटल रुपया जारी केला जाणार आहे. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर 30 टक्के कर लावण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. त्यासोबत सीतारामण यांनी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावरील आव्हानांचा सामना करत आहे मात्र या परिस्थितीत देखील भारतानं कोरोनो महासाथीच्या आव्हानांचा चांगला सामना केला आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या एका अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. या वर्षीच्या बजेटमध्ये पुढील 25 वर्षाची ब्ल्यू प्रिंट असेल. देशात आर्थिक रिकव्हरीला बळकट करण्यावर फोकस केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा -Budget 2022: यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण क्षेत्रात तब्बल 10 टक्क्यांनी वाढ )
आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन
या अर्थसंकल्पातून भारताचा पुढील 25 वर्षांचा पाया रचण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटले. पुढील आर्थिक वर्षात विकास दर 9.2 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सावरतेय. आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार आहोत, असं त्या म्हणाल्या. 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे. सर्वसमावेशक विकास हेच सरकारचे ध्येय असेल, असे त्यांनी सांगितले.