संसदेचे आगामी अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तसेच, येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. परंतु, पाच राज्यांच्या होणा-या विधानसभा निवडणुकांमुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे.
अधिवेशन दोन टप्प्यांत
संसदेचे अधिवेशन दोन टप्प्यांत होणार आहे. पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान असेल, तर दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जातो. त्यावर चर्चा करुन अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाते. त्यानंतर काही दिवसांच्या सुट्टीनंतर अधिवेशनाच्या दुस-या टप्प्याला सुरुवात होते.
लवकर आटपू शकते अधिवेशन
पण, यावेळी राजधानी दिल्लीत कोरोनाचा वाढता प्रभाव, तसेच पाच राज्यांच्या निवडणुका घोषित झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा लवकर संपवून दुसरा टप्पा मार्च महिन्यात मतदानाची प्रक्रिया संपवल्यानंतर सुरु करण्यावर राजकीय पक्षांचे एकमत होऊ शकते. संसद सचिवालयातील अधिका-यांनी अधिवेशनाचा पहिला टप्पा लवकर संपवण्याची शक्यता नाकारली आहे.
( हेही वाचा :आजपासून कुणाला आणि कसा मिळणार बूस्टर डोस? जाणून घ्या…)
हा अर्थसंकल्प वेगळा असेल
आगामी अर्थसंकल्प हा आधीच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा असणार आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या. सरकार कोरोनामुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देणाचा प्रयत्न करणार आहे. आरोग्य, मेडिकल रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट आणि टेलिमेडिसिन या क्षेत्रांसाठी एक चांगलं वातावरण विकसित करणं महत्वाचं आहे. याचसोबत रोजगाराच्या आव्हानाला नव्या दष्टीकोनातून बघायला हवं, व्होकेशनल ट्रेनिंग आणि स्किल डेव्हलपमेंट या विषयांवर भर देणं गरजेचं आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community