स्वातंत्र्यवीर सावरकरः पहिले आणि सर्वात मोठे सैन्यकूटनीतीक व सामरिक तज्ज्ञ

सावरकरांनी स्वतंत्र भारतासाठी मजबूत संरक्षण आणि सर्वोच्च मुत्सद्देगिरीचं उदाहरण जगासमोर ठेवले आहे.

120

Veer Savarkar: The Man Who Could Have Prevented Partition या उदय माहुरकर लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते मंगळवारी संपन्न झाला. यावेळी राजनाथ सिंह यांनी सावरकरांच्या कार्याचा गौरव केला. सावरकर हे श्रेष्ठ देशभक्त तर होतेच पण त्यासोबतच ते भारताचे कूटनीतीक तसेच सामरिक तज्ज्ञ देखील होते. आपल्या देशाच्या मजबूत संरक्षणासाठी सावरकरांनी मांडलेले विचार हे आजही मार्गदर्शक असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

संरक्षणासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान

सावरकरांसाठी देश सगळ्यात आधी होता. इतर देशांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी तो देश भारतासाठी किती अनुकूल आहे, यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, असे सावरकरांनी सांगितले. त्या देशातील सरकार कसे आहे, यापेक्षा जोपर्यंत एखाद्या देशाचे वर्तन भारतासाठी अनकूल आहे तोपर्यंतच तो देश आपल्यासाठी अनुकूल आहे, असे सावरकरांचे म्हणणे होते. त्यांचे हेच विचार आजही जगातील देशांची परराष्ट्र नीती ठरवण्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहेत. सावरकरांनी स्वतंत्र भारतासाठी मजबूत संरक्षण आणि सर्वोच्च मुत्सद्देगिरीचं उदाहरण जगासमोर ठेवले आहे. त्यामुळे सावरकर हे 20व्या शतकातील सर्वप्रथम आणि सर्वात मोठे सैन्यकूटनीतीक आणि सामरिक तज्ज्ञ असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

(हेही वाचाः मूठभर मूर्ख नेते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं कार्य कधीही मिटवू शकत नाहीत! फडणवीसांचा हल्लाबोल)

सावरकर महानायक होते, आहेत आणि राहतील

स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या राष्ट्रनायकांच्या आयुष्याचे इतके पैलू आहेत की ते एका पुस्तकात समाविष्ट करणे हे खूपच आव्हानात्मक काम आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान स्वातंत्र्यसैनिक आहेत, यात कुठलेही दुमत नाही. त्यांना कुठल्याही विचारधारेच्या चष्म्यातून बघून त्यांचा अपमान करणे, राष्ट्रनिर्मितीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला दुर्लक्षित करणे हे कधीही माफ केले जाऊ शकत नाही, अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी सावरकरांवर तथ्यहीन टीका करणा-यांना सुनावले. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशाचे महानायक होते, आहेत आणि राहतील, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

सावरकरांचं हिंदुत्व समजून घेण्याची गरज

मार्क्सवादी विचारसरणीच्या काही लोकांकडून कायमंच सावरकरांवर टीका केली जाते. सावरकरांनी हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार केला. पण ते एका विशिष्ट ‘वादी’ असण्याच्या वादात कधीही अडकले नाहीत. ते यथार्थवादी आणि राष्ट्रवादी होते हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. त्यांच्यासाठी राष्ट्राचे केवळ राजकीयच नाही, तर सांस्कृतिक अस्तित्व सुद्धा होते. देशातील नागरिकांमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक मुद्द्यांच्या आधारे कोणामध्येही भेदभाव केला जाऊ नये, अशी सावरकरांच्या आदर्श राष्ट्राची संकल्पना होती. त्यामुळे त्यांचं हिंदुत्व नीट समजून घेण्याची गरज आहे. व्यक्ती कुठल्याही धर्माची किंवा पंथाची असली, तरी जो आपल्या भारतभूमीला पुण्यभूमी, मातृभूमी आणि पितृभूमी मानतो तो प्रत्येक भारतीय हिंदू आहे, हे त्यांचे विचार होते. या त्यांच्या विचारांमुळे अनेकांना त्रास होणं समजू शकतो. पण त्यामुळे सावरकरांचा द्वेष करणं हे कधीही स्वीकारले जाणार नाही, असा थेट इशारा राजनाथ सिंह यांनी दिला.

(हेही वाचाः बुद्धीभेद निर्माण करणा-यांना सावरकरांच्या विचारांनीच उत्तर देऊ)

राष्ट्रवादः सावरकरांच्या विचारधारेचे अभिन्न अंग

सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांना प्रेरित केले. इतकंच नाही तर त्यावेळी देशातील अस्पृश्यतेसारख्या अनिष्ट रुढींचा देखील त्यांनी विरोध केला. याविरोधात त्यांनी मांडलेले विचार आणि त्यांचे कार्य यांमधूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील प्रेरित झाले होते. सावरकरांनी विधवा विवाह, स्त्रीशिक्षण यांचा पुरस्कार केला. मंदिरांमध्ये सर्व जातींच्या लोकांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी लढा दिला. ते ख-या अर्थाने एक महान समाजसुधारक आहेत. राष्ट्रवाद सावरकरांच्या विचारधारेचे अभिन्न अंग आहे आणि मानवता हा त्याचा आधार आहे.

(हेही वाचाः स्वातंत्र्यवीर सावरकर नाही, नेहरुच होते खरे माफीवीर! भातखळकरांचा हल्लाबोल)

सावरकरांनी पाश्चात्य देशांतील राज्यक्रांतीचा सुद्धा सखोल अभ्यास केला होता. त्यामुळे भारताला स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग देखील अवलंबायला हवा, असे सावरकरांचे स्पष्ट विचार होते. त्यासाठी त्यांनी मित्रमेळा आणि अभिनव भारताची स्थापना करुन इतर क्रांतिकारकांना प्रेरणा देण्याचे मोठे काम केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.