लसीकरणावरुन आरोप करणा-या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज! केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी फटकारले

66

लसींच्या पुरवठ्यावरुन काही राज्यांकडून केंद्र सरकारवर अनेक आरोप करण्यात येत आहेत. काँग्रेसचे नते राहुल गांधी यांनी सुद्धा आपल्या विधानांतून, लसीकरणाच्या बाबतीत केंद्र सरकारचे धोरण चुकले असून, केंद्र सरकार त्याबाबतीत अपयशी ठरले आहे, अशी टीका केली आहे. याच बाबतीत आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत. लोकांमध्ये भ्रम निर्माण करुन, त्यांच्या मनात भीती घालून देणा-या नेत्यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे, अशा शब्दांत त्यांनी टीकाकारांना चांगलेच फटकारले आहे.

जून-जुलै महिन्यात इतक्या लसींचा पुरवठा

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालयांतून लसीकरण सुलभरित्या होण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जून महिन्यात 11.46 करोड डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे जुलै महिन्यात हे प्रमाण वाढवून 13.50 करोड करण्यात आले, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

(हेही वाचाः राहुल गांधींना आरोग्य मंत्र्यांनी दिला ‘बूस्टर डोस’! म्हणाले, त्यांना काही समजत नाही)

लसींच्या पुरवठ्याबाबत राज्यांना दिली पूर्वकल्पना

जुलै महिन्यात राज्यांना दिल्या जाणा-या लसींच्या उपलब्धतेबाबत 19 जून 2021 रोजीच राज्यांना केंद्र सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. तसेच 27 जून आणि 13 जुलै रोजी राज्यांना जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुस-या पंधरवड्यात दर दिवशी किती लसी देण्यात येतील याची माहिती सुद्धा आधीच देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला मिळणा-या डोसच्या एकूण संख्येची माहिती राज्यांना आधीच मिळाली आहे. जिल्हा स्तरावर लसींचा पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारला योग्य ते नियोजन करता यावे, या हेतूने केंद्र सरकारने ही माहिती राज्यांना आधीच दिली आहे, असे मनसुख मांडवीय यांनी सांगितले.

(हेही वाचाः म्हणून आम्ही स्वबळाची तयारी करतोय…अखेर नानांनी सांगितले कारण)

राज्यांचे ढिसाळ नियोजन

केंद्र सरकारने राज्यांना लसींच्या पुरवठ्यासंबंधी पूर्वकल्पना देऊनही जर लसीकरणासाठी लांबच्या लांब रांगा दिसत असतील, तर या ढिसाळ नियोजनाला कोण जबाबदार आहे, हे जनतेसमोर स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये भ्रम निर्माण करुन लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

(हेही वाचाः मी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात पण… अखेर मुख्यमंत्र्यांनी मनातलं सांगितलंच)

आरोप करणा-यांनी शासकीय प्रक्रिया आणि आपल्यात अंतर निर्माण केले आहे का, ज्यामुळे त्यांना लसीकरणाच्या संदर्भात दिल्या जाणा-या माहितीची काहीच माहिती नाही, असा खोचक सवालही त्यांनी टीकाकारांना विचारला आहे.

(हेही वाचाः शिक्षण विभागातही ‘वाझें’चा सुळसुळाट! क्रीम पोस्टिंग, शिक्षक नियुक्ती घोटाळा!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.