केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया हे सध्या मुंबई दौ-यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर उपस्थित होते. तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजपच्या दादर विधानसभा पदाधिकारी अक्षता तेंडुलकर, विलास आंबेकर, जितेंद्र राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

सिंदिया यांची स्मारकाला भेट

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे ज्योतिरादित्य सिंदिया यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची प्रतिकृती आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात असलेल्या अंदमानातील प्रतिकात्मक सेल्यूलर जेलला देखील सिंदिया यांनी भेट दिली. तसेच अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांसह इतर सर्व क्रांतिकारकांना देण्यात येणारी कठोर शिक्षा असलेल्या प्रतिकात्मक कोलूला भेट देऊन त्याची पाहणी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे आदर्श

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. ज्योतिरादित्य सिंदिया यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या सहकारी क्रांतिकारकांच्या साहसाला आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीला नमन करत, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श संपूर्ण देशाने ठेवायला हवा, असेही त्यांनी म्हटले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here