केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी, १९ ऑगस्ट २०२१ या दिवशी मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू केली. या यात्रेमध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्मारकात आल्यानंतर प्रथम स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला नमन केले. त्यानंतर त्यांनी स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर, कार्यकारिणी सदस्य मुकुंद गोडबोले उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या प्रसंगी स्मारकाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा आणि वीर सावरकरांचे ग्रंथ भेट म्हणून देण्यात आले. यावेळी नारायण राणे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.
(हेही वाचा : अखेर नारायण राणेंची ‘ती’ इच्छा पूर्ण झाली!)
जन आशीर्वाद यात्रेत वीर सावरकरांच्या पुतळ्याचे घेतले दर्शन!
केंद्रीय मंत्रिमंडळात ४२ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. या मंत्र्यांचा जनसामान्यांशी संपर्क वाढावा, याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्र्यांना जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यास सांगितले आहे. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ झाला. या यात्रेची सुरुवात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले, त्यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले, पुढे ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट देत त्यांनी वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.
Join Our WhatsApp Community