आता प्रत्येकाला घरोघरी जाऊन ‘लसवंत’ करणार? केंद्र सरकारकडे प्रस्ताव

इतर वयोगटातील लाभार्थ्यांना सुद्धा लवकरात लवकर लस द्यायला सुरुवात केली जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

कोरोनाची दुसरी लाट ही नुसती लाट नाही, तर महाभयंकर अशी त्सुनामी आहे. या लाटेचा आवाका इतका मोठा आहे, की ती काही क्षणात अनेकांना आपल्या कवेत घेत आहे. त्यामुळे या त्सुनामीला रोखण्यासाठी लस हा एकमेव उपाय असल्याचे दिसत आहे. भारतात उत्पादित होत असलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचा पुरवठा, हा सध्या कमी पडत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता भारतात काही विदेशी लसींच्या वापरासाठी आपत्कालीन परवानगी देण्यात आली आहे. यामुळे भारतातील लसीकरणाचा वेग नक्कीच वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व भारतीयांना ‘लसवंत’ करण्यासाठी घरोघरी जाऊन लस देण्याचा विचार करण्यात येत आहे. त्यासाठी अनेक कंपन्यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव केल्याची माहिती मिळत आहे.

प्रत्येकाला लस देण्यासाठी योजना

स्पुतनिक-V या लसीला आपत्कालीन परवानगी मिळाल्याने, आता भारतात वेगवान लसीकरण मोहीम हातात घेण्यासाठी तयारी सुरू आहे. देशातील काही कंपन्यांनी प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी संपर्क साधला असल्याची माहिती मिळत आहे. ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना आता लस देण्यासाठी योजना आखण्यात येणार आहे. या योजनेला अंतिम मंजुरी मिळताच नागरिकांना घरोघरी जाऊन लस देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

(हेही वाचाः या विदेशी व्हॅक्सिन लवकरच येणार भारतात… काय आहे त्यांची किंमत? किती आहेत प्रभावी? वाचा…)

लवकरच होणार विचार

अनेक फार्मा कंपन्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला असा प्रस्ताव दिल्याचे समजते. पण अजूनही कोणत्याही कंपनीला परवानगी देण्यात आली नसल्याचे, आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पण लवकरच याबाबतीत सकारात्मक विचार केला जाऊ शकतो, असे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

आणखी काही लसींना परवानगी मिळणार?

येत्या काही महिन्यांत देशातील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईल. त्यामुळे आता येत्या काही महिन्यांत इतर वयोगटातील लाभार्थ्यांना सुद्धा लवकरात लवकर लस द्यायला सुरुवात केली जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. येत्या काही महिन्यांतच आणखी काही लसींना परवानगी देण्यात येईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here