Mumbai-Ahemadabad Bullet Train: कधी धावणार देशातील पहिली बुलेट ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती

बुलेट ट्रेन हा केंद्रातील मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प कधी सुरू होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. याबाबत आता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन 2026 मध्ये सुरू होईल, अशी आशा अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली आहे.

रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केली आशा

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा आढावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमावरी घेतला. त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली आहे. या प्रकल्पासाठी लागणा-या पायाभूत सुविधांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गुजरातमधील सुरत ते बिलीमोरा दरम्यान 2026 पर्यंत बुलेट ट्रेन धावावी असे आमचे ध्येय आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालय प्रयत्नशील आहे. सध्या सुरु असलेल्या कामाचा वेग पाहता हे ध्येय 2026 पर्यंत साध्य होईल, अशी आम्हाला आशा आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः नोटांवरील गांधींचा फोटो हटवणार? RBI ने केला मोठा खुलासा)

असा आहे प्रकल्प

मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर ताशी 320 किमी. वेगाने बुलेट ट्रेन चालवण्याचा प्रकल्प आहे. यामुळे हे 508 किमी. अंतर कमी वेळात कापण्यास मदत होणार आहे. केवळ तीन तासांत हे अंतर कापले जाईल, असे सांगण्यात येत आहे. या मार्गादरम्यान एकूण 15 स्थानके असणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 1.1 लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यापैकी 81 टक्के निधी हा Japan International Co-operation Agency(JICA)कडून पुरवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात संथगतीने काम

गुजरातमध्ये या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असताना, महाराष्ट्रात मात्र हे काम संथगतीने सुरू आहे. भूसंपादनाच्या कामात अडचण येत असल्यामुळे महाराष्ट्रात या प्रकल्पाचे काम रखडले असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. हा राष्ट्रीय प्रकल्प असल्याने महाराष्ट्र सरकारने सहकार्याच्या भावनेने काम करावे, असे आवाहन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले आहे.

(हेही वाचाः Traffic problem in Mahabaleshwar : महाबळेश्वर होणार इको हिल स्टेशन! खासगी वाहनांवर येणार बंदी?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here