‘महाराष्ट्राला दिवाळी अंकांची शंभर वर्षांची परंपरा लाभली आहे. दिवाळीला जसा आपण फराळ करतो तसाच अक्षरांचा फराळ, विचारांचा फराळ देण्याची प्रथा या दिवाळी अंकांची आहे. व्यासने एकाचवेळी चार विविध विषयांना वाहिलेल्या चार दिवाळी अंकांचे प्रकाशन करण्याचे धाडस केले आहे. वाचनसंस्कृती वाढावी, सांस्कृतिक पर्यावरण चांगलं व्हावं याचा ध्यास घेणारी व्यास क्रिएशन्स संस्था चांगले काम करीत आहे. यानिमित्ताने आपण सर्वांनी ज्ञानाची दिवाळी अनुभवली.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि गीतकार अशोक बागवे यांनी केले.
( हेही वाचा : सर्व सरकारी बॅंकांसाठी एकच हेल्पलाईन क्रमांक; ग्राहकांच्या समस्यांचे होणार निवारण)
व्यास क्रिएशन्स प्रकाशित चार दिवाळी अंकांच्या चार दिवाळी अंकांच्या प्रकाशन समारंभात् ते बोलत होते. कार्यक्रमाला माध्यम तज्ञ रविराज गंधे, ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी, रंगकर्मी नयना आपटे, वृत्त निवेदिका शिबानी जोशी, मराठी सृष्टी डॉट कॉमचे निनाद प्रधान आणि ई साहित्य प्रतिष्ठानचे सुनील सामंत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिभा- कोकण , पासबुक आनंदाचे – पैसा , आरोग्यम् – आई बाबा व्हायचंय? आणि ज्येष्ठ विश्व -ज्येष्ठत्वाकडून श्रेष्ठत्वाकडे अशा चार अंकांचे आणि ई आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात आले.
संस्थेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कोकण या विषयावर निबंध, घोष वाक्य, कविता आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. कोकणातल्या एकूण सात जिल्ह्यातून एकूण १७०० स्पर्धकांनी या चारही स्पर्धात भाग घेतला आणि त्यातून १७० अंतिम विजेते निवडले गेले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनी यावेळी बाजी मारली. सर्वाधिक विजेते याच जिल्ह्यातले होते. परीक्षक कवी, चित्रकार रामदास खरे आणि चित्रकार भारत नगरकर यांनी केले. तसेच या सर्व स्पर्धांचे नियोजन साक्षी गायकवाड आणि गायत्री डोंगरे यांनी केले.
प्रमुख पाहुणे माध्यम तज्ज्ञ, लेखक रविराज गंधे म्हणाले ‘ या दिवाळी अंकांच्या निमित्ताने सर्वसामान्य माणसांच्या जाणिवा, आकांशा, भविष्याची स्वप्नं, विकासाच्या संधी या संदर्भातले मौलिक मार्गदर्शन विविध अंकांमधून व्यास क्रिएशन्स यांनी जाणीवपूर्वक केलं आहे आणि ते मला महत्वाचे वाटते. साहित्य व्यवहाराचे समाजीकीकरण आणि साहित्याची रुची वाढवण्याचे काम व्यास करत आहे याचे समाधान अधिक आहे.’ तर ज्येष्ठ रंगकर्मी नयना आपटे म्हणाल्या ‘ प्रेक्षकांचा असा उत्फुर्त प्रतिसाद पाहून वाचन संस्कृती संपलेली नाही याचा प्रत्यय आला. नवीन लिहिणाऱ्या नवं पिढीला व्यास क्रिएशन्सच्या रूपानं प्लॅटफॉर्म मिळत आहे.’ ‘क्षण आला भाग्याचा ‘हे नाट्य पद गाऊन रसिकांची वाहवा मिळवली.
व्यास क्रिएशन्सचे संचालक नीलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन धनश्री प्रधान दामले यांनी केले.. व्यास क्रिएशन्सचे व्यवस्थापक दीपक देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. तब्बल चार तास चाललेला हा सुंदर कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत गेला.
Join Our WhatsApp Community