घरातील चोरी रोबो नंदी थांबवणार; महिलांचे रक्षण रोबोटिक सॅण्डल करणार! चिल्ड्रेन टेक सेंटरचे अनोखे उपक्रम

177

बदलत्या काळानुसार मुलांना शालेय अभ्यासक्रमाबरोबरच आधुनिक कौशल्य शिकवणे ही काळाची गरज होऊन बसलेली आहे. गेल्या दहा वर्षांत तंत्रज्ञानाने अद्भुत प्रगती केली. रोबोटिक्स, आय. वो. टी, मशीन लर्निंग , ३ डी प्रिंटिंग, ड्रोन, गुगल होम, ऍमेझॉन अलेक्सा, अशा नवनवीन संकल्पना आपल्या जीवनाचा अभिवाज्य भाग बनल्या आहेत. याच गोष्टीचे महत्व ओळखून गेल्या ९ वर्षांपासून चिल्ड्रेन टेक सेंटर हे शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक विषयांचे तसेच तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देत आहे. आजवर १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी चिल्ड्रेन टेक सेंटरच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे.

( हेही वाचा : पश्चिम व मध्य रेल्वेच्या सुविधांमध्ये भेदभाव का? )

संकटसमयी महिलांचे रक्षण करणारी सॅंडल, घराचे संरक्षण करणारा रोबो नंदी, बोलणारा आकाश कंदील आणि बहिणीविषयी शब्दांमध्ये भावना व्यक्त करणारी बोलकी राखी या विविध तांत्रिक वस्तू चिल्ड्रेन टेक सेंटरने २०१४ रोजीच बनवल्या होत्या. येत्या काळात महाराष्ट्रात गावोगावी मुलांसाठी रोबो लॅब उपक्रम सुरू करण्याचा पुरुषोत्तम पाचपांडे यांचा संकल्प आहे. घराघरात तंत्रज्ञान पोहोचावे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेऊन पाचपांडे यांनी ‘रोबो लॅब’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत रोबो लॅबचा पूर्ण सेटप चिल्ड्रन टेक सेंटर शुल्क आकारून उपलब्ध करून देणार आहे. जे ट्रेनिंग आतापर्यंत मुले या सेंटरमध्ये येऊन घेत होती तेच ट्रेनिंग आता मुलांना या ‘रोबो लॅब’च्या माध्यमातून देणे शक्य होणार आहे. लहानपणापासूनच मुलांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पुरुषोत्तम पाचपांडे यांनी ठाण्यात चिल्ड्रेन टेक सेंटर सुरू केले. तंत्रज्ञानाचा वापर करून सोप्या पद्धतीने अनेक प्रकल्प करवून घेतल्याने चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञाविषयी आत्मविश्वास निर्माण झाला आहे. असेही त्यांनी सांगितले.

रोबो नंदी

कोरोनानंतर चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून चिल्ड्रन टेक सेंटरच्या मुलांनी रोबो नंदी बनवला. या रोबो नंदी तुम्ही घरात नसताना तुमच्या घराचे रक्षण करणार आहे. चिल्ड्रन टेकच्या पुरुषोत्तम पाचपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शार्दुल दातार, हर्षल वेलिंग, सुनील पाटील, व्योम व्यास, आमोद पंत आणि शौनक स्वरगावकर यांनी हा रोबो तयार केला आहे. हा रोबो तुम्हाला तुमच्या फोनला जोडून ठेवायचा असून, या खेळण्यासारख्या दिसणाऱ्या रोबोला सेन्सर लावलेले आहेत. घरात नसताना कोणताही व्यक्ती घरी आला तर सेन्सर कार्यान्वित होऊन तुमच्या फोनवर फोन येईल. यामुळे चोराला पकडणे सोपे होईल.

रोबोटिक सॅण्डल

महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये सध्या लक्षणीय वाढ झालेली आहे. यावर उपाय म्हणून चिल्ड्रन टेक सेंटरच्या मुलांनी रोबोटिक सॅण्डल बनवली आहे. छेडछाड किंवा अत्याचाराचा प्रसंग ओढावला की महिलांनी या सॅण्डलचे घर्षण केल्यास महिला-तरूणी संकटात असल्याचा संदेश तिच्या नातेवाईकांना तत्परतेने मिळणार आहे. अशाप्रकारे विविध तंत्रज्ञान विषयक ज्ञान मुलांना लहानपणापासूनच देण्याचा पुरुषोत्तम पाचपांडे यांचा प्रयत्न आहे. सध्या चिल्ड्रेन टेक सेंटरची ठाण्यात शाखा आहे. तसेच रविवार ८ मे २०२२ रोजी त्यांच्या नाशिक येथील शाखेचे उद्घाटन होणार आहे.

महाराष्ट्रातील गावोगावच्या मुलांना तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळावी याकरता आधुनिक लॅब डिझाईन केली आहे. यामुळे विद्यार्थी लहान वयातच तंत्रज्ञानाशी जोडले जातील. या लॅबद्वारे मुलांना ड्रोन, इलेक्ट्रॉनिक्स, गुगल होम, सेन्सर अशा विविध तांत्रिक विषयांची माहिती मिळेल. – पुरुषोत्तम पाचपांडे 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.