स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आयोग सुधारणा विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या एका स्वाक्षरी मुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. यावरून असे समजते आहे की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पुढे ढकलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आयोग सुधारणा विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे.
निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर
निवडणूक आयोग सुधारणा विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केल्याने मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या आगामी निवडणुका किमान सहा महिने तरी लांबणीवर जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचा – देशमुख, मलिकांनंतर आता सोमय्यांच्या टार्गेटवर ‘या’ मंत्र्याचा नंबर! )
सरकारला डेटा गोळा करण्यास मिळणार अवधी
दरम्यान, ओबीसींना निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळवून देण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कायद्यात बदल करण्याचे विधेयक दोन्ही सभागृहात सादर केले होते. हे विधेयक दोन्ही सभागृहात एकमताने मंजूरही झाले. त्यानंतर हे विधेयक राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी आता काहीशी कमी झाली आहे. मुंबईसह विविध महापालिकांच्या निवडणुका पुढे गेल्यामुळे, आता राज्य सरकारला ओबीसींचा इम्पेरिकल डेटा नव्यानं गोळा करण्यासाठी चार ते पाच महिन्यांचा अवधी मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.