एटीएसच्या पथकाने काही दिवसांपूर्वी युरेनियमचा बेकायदेशीर साठा केल्याप्रकरणी ठाणे आणि मानखुर्द परिसरातून दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून बेकायदेशीर युरेनियमचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसकडून हा तपास काढून राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए)कडे सोपवण्यात आला आहे.
एटीएसकडून एनआयएकडे तपासाची सूत्र
राज्य दहशतवाद विरोधी पथक(एटीएस)ने जिगर पंड्या आणि अबू ताहीर चौधरी या दोन उच्च शिक्षित तरुणांना अटक करुन, त्यांच्याजवळील ७ किलो १०० ग्राम युरेनियमचा बेकायदेशीर साठा मानखुर्द येथून जप्त केला होता. जप्त करण्यात आलेले युरेनियम हे नैसर्गिक युरेनियम असून, मानवी जीवितास हानिकारक असल्याचा अहवाल भाभा अणुशक्ती केंद्राने दिला आहे. या प्रकरणी एटीएसकडून काळाचौकी युनिटमध्ये आण्विक ऊर्जा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या दोघांना एनआयए विशेष न्यायालयाने १२ मे पर्यंत एटीएस कोठडी सुनावली होती.
दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाकडून हा तपास एनआयएकडे सोपवण्यात यावा, असे आदेश राज्य सरकारला देण्यात आले होते.
(हेही वाचाः धक्कादायक! ७ किलो युरेनियम जप्त! )
विशेष पथक करणार तपास
केंद्राच्या आदेशावरुन युरेनियम प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला असून, एनआयएने या प्रकरणात नव्याने गुन्हा दाखल केला आहे. तसेच एनआयए सुरुवातीपासून या गुन्हयाचा तपास सुरू करणार आहे. या तपासासाठी एनआयएचे एक विशेष पथक गठीत करण्यात आले आहे. युरेनियम कुठून आले, त्याची विक्री कुणाला करण्यात येणार होती, याबाबत सविस्तर तपास हे विशेष पथक करणार आहे.
Join Our WhatsApp Community