भारतात लस उत्पादन वाढणार… कोविशिल्डसाठी लागणा-या कच्च्या मालाचा अमेरिका करणार तातडीने पुरवठा!

भारत सरकारच्या या प्रयत्नांना यश आले असून, हा कच्चा माल तातडीने उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.

95

सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लसीसाठी लागणा-या कच्च्या मालाचा लवकरात लवकर भारताला पुरवठा करणार असल्याचे, अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला हा पुरवठा आता सुरळीत होणार असल्याने, भारतातील कोविशिल्डच्या उत्पादनास अधिक बळकटी मिळणार आहे.

लस उत्पादनास मिळणार चालना

भारतात 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे वाढत्या लसींची संख्या लक्षात घेता, मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन करण्याचीही गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून सिरमच्या कोविशिल्ड लसीसाठी लागणा-या कच्च्या मालाचा पुरवठा अमेरिकेकडून थांबला होता. सिरमच्या अदर पुनावाला यांनी सुद्धा याबाबत माहिती दिली होती. तसेच या कच्चा मालाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी भारत सरकारकडून देखील अमेरिकेकडे पाठपुरावा करण्यात येत होता. त्यामुळे भारत सरकारच्या या प्रयत्नांना यश आले असून, हा कच्चा माल तातडीने उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या चर्चेत भारतातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. या चर्चेदरम्यान भारताला अमेरिकेकडून आश्वासन देण्यात आले आहे.

(हेही वाचाः 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना घेता येणार लस… केंद्र सरकारचा मोठा निर्णय!)

इतर आरोग्य साधनांचाही होणार पुरवठा

त्याचप्रमाणे कोविड रुग्ण आणि फ्रंट लाइन वर्कर्सच्या सुरक्षेसाठी टेस्ट किट, व्हेंटिलेटर्स आणि पीपीई किटचा सुद्धा पुरवठा करण्यात येणार आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत सुद्धा विचार सुरू असल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनकडून हैद्राबाद येथील बायो-ई या फार्मा कंपनीला लस निर्मितीसाठी मदत केली जाणार आहे. 2022 पर्यंत 10 लाख लसींचे उत्पादन करण्यासाठी सक्षम करण्यात येणार असल्याचे, सांगण्यात येत आहे.

युरोपियन युनियनही करणार मदत

तसेच युरोपियन युनियन कडून देखील भारतात होत असलेल्या ऑक्सिजनचा तुटवडा भरुन काढण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. फ्रान्सकडूनही भारताला वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार असल्याचे, फ्रान्स सरकारकडून सांगण्यात आले आहे.

(हेही वाचाः राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस! महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.