भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध हे फार जुने आहेत. पण आता ही मैत्री अधिक घट्ट झाली आहे. अमेरिकेसोबतच्या मैत्रीमध्ये भारताने आता चीनला देखील मागे टाकले आहे. अमेरिकेसोबतच्या भारताच्या व्यापारात सुद्धा लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेमधल्या व्यावसायिक संबंधांना चांगले दिवस झाले आहेत.
व्यापारात लक्षणीय वाढ
गेल्या आर्थिक वर्षात अमेरिकेचा चीनपेक्षा जास्त भारतासोबत व्यापार झाला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारत दुसरा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार ठरला आहे. चीनपेक्षा भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार आता वाढला आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितलेल्या आकडेवारीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात अमेरिका-भारत द्विपक्षीय व्यापार वाढून 119.42 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. हाच व्यापार 2020-21 या आर्थिक वर्षात 80.51 अब्ज डॉलर इतका होता.
(हेही वाचाः खोट्या नोटा वाढल्या! RBI ने सांगितली धक्कादायक आकडेवारी)
आयात-निर्यात वाढली
2021-22 या आर्थिक वर्षात भारताकडून अमेरिकेला झालेल्या निर्यातीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये अमेरिकेला करण्यात आलेली 51.62 अब्ज डॉलरची निर्यात वाढून या आर्थिक वर्षात 76.11 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. त्याचसोबत अमेरिकेतून भारतात होणारी आयात देखील वाढून, 43.31 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. ही आयात याआधी 29 अब्ज डॉलर इतकी होती. त्यामुळे आगामी काळात भारत आणि अमेरिकेतील हे व्यापारी संबंध अधिक मैत्रीपूर्ण होऊन, त्याचा दोन्ही देशांना आर्थिक फायदा होणार असल्याचे मत उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
(हेही वाचाः नेपाळमध्ये ४ मुंबईकरांसह २२ जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता!)
Join Our WhatsApp Community