मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये अनेकदा निर्माण झालेली पाण्याची गळती किंवा दूषित पाण्याचा शिरकाव शोधणे हे मोठे आव्हानात्मक काम असते. हे काम वेळच्या वेळी व तातडीने व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाच्या वतीने जलवाहिन्यांमधील गळतीचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी क्राऊलर कॅमेराचा वापर करण्यात येत आहे. अशा प्रकारचा कॅमेरा महापालिकेच्या जल अभियंता विभागाकडे होता, पण तो नादुरुस्त झाल्याने आता अत्याधुनिक पद्धतीचा क्राऊलर कॅमेराचा वापर करण्यात येणार असून या खरेदीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापनासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल तसेच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांच्या निर्देशानुसार अव्याहतपणे पाणी पुरवठ्याच्या सेवेचे काम सुरू असते. नागरी सेवांमध्ये पाण्यासारखी सुविधा अखंडीतपणे देण्यासाठीच्या अनुषंगाने उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर आणि जलअभियंता पुरूषोत्तम माळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना सेवा पुरविल्या जातात. याच उपाययोजनांचा भाग म्हणून दुरुस्तीच्या कामातील वेळेची बचत होण्याच्या अनुषंगाने क्राऊलर कॅमेऱ्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. क्राऊलर कॅमेऱ्याच्या वापरामुळे नागरिकांचा पाणी पुरवठा किमान वेळेत सुरळीत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे. तसेच दुरुस्तीच्या कामात जलअभियंता विभागाचा महत्वाचा वेळ वाचण्यासाठीही मदत होणार आहे.
कॅमेराने गळती कशी शोधणार?
अनेकदा पाण्याची गळती झाल्याचे नेमके ठिकाण शोधणे ही अतिशय आव्हानात्मक आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. मुंबईतील जलवाहिन्यांचे जाळे हे भूमिगत असून अतिशय क्लिष्ट अशा जलवाहिनीच्या वितरण जाळ्यामुळे पाण्याची गळती अथवा दूषित पाणीपुरवठ्याचे ठिकाण शोधणे हे आव्हान ठरत असते. त्यामुळे सीसीटीव्ही सारखी पद्धती असणाऱ्या विशेष उपकरणाच्या माध्यमातून जलवाहिनीच्या आतमध्ये हा क्राऊलर कॅमेरा वापरात येईल. क्राऊलर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नेमके ठिकाण, घटनास्थळाचा व्हिडिओ मिळवणे, व्हिडिओ रेकॉर्ड करणे शक्य होते. कॅमेऱ्याच्या वापरामुळे कधीही हा डेटा उपलब्ध होणे शक्य आहे. अनेकदा खोदकाम करूनही गळतीचे नेमके ठिकाण सापडत नाही अशा ठिकाणी क्राऊलर कॅमेरा जलअभियंता विभागाला गेल्या १२ वर्षांच्या कालावधीत अतिशय उपयुक्त ठरला आहे. कॅमेऱ्याला चार चाकांमुळे २०० मीटरपर्यंतचे अंतर पार करणे शक्य आहे. या कॅमेऱ्याचे संचलन दूरसंवेदक (रिमोट)ने करणे शक्य आहे. त्यासोबतच जलवाहिनीच्या आतील बाजूची दृश्ये टिपणे, रेकॉर्ड करण्यासाठी प्रखर दिव्यांची प्रकाशयोजनाही कॅमेऱ्याला करण्यात आली आहे.
(हेही वाचा – डॉ. रू. न. कूपर रुग्णालयात एन्डोस्कोपी सेवेचा प्रारंभ; अत्याधुनिक पद्धतीने होणार पोटविकारांचे निदान)
गळतीचे नेमके ठिकाण किंवा दूषित स्रोत शोधणे शक्य
महत्वाचे म्हणजे जलवाहिन्यांमध्ये जेव्हा गळती शोधण्यासाठी माणूस उतरून काम करणे शक्य होत नाही, अशा ठिकाणी या कॅमेऱ्याचा वापर खूपच सोईचा आहे. या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा कॅमेरा डेटा रेकॉर्ड करायलाही मदत करतो. कॅमेऱ्याच्या वापरामुळे जलवाहिनीचा आकार, जलवाहिनीतील रुंदी किंवा निरीक्षण केलेले अंतर अशी सर्व आकडेवारी उपलब्ध व्हायला मदत होते. परिणामी गळतीचे नेमके ठिकाण किंवा दूषित स्रोत शोधणे शक्य होते.
जलवाहिनीच्या आत २०० मीटर अंतरापर्यंत टिपू शकतो कॅमेरा
जलवाहिनीच्या आतील बाजूला कॅमेरा २०० मीटरच्या अंतरासाठी वापरला जाणे शक्य आहे. तसेच २५० मिमी ते १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांसाठी या कॅमेऱ्याचा वापर करणे शक्य आहे. जल अभियंता विभागाकडून नियोजित आणि तातडीच्या स्वरूपात कामे हाती घेण्यात येतात. अनेक कामांचे स्वरूप हे आपत्कालीन स्वरूपाचे तसेच पाणी वितरणाच्या यंत्रणेच्या सक्षमीकरण किंवा दुरुस्तीच्या रूपातील असते. त्यामुळेच क्राऊलर कॅमेऱ्याचा दोन वर्षासाठीचा वापर करण्यासाठीची निविदा प्रक्रिया जलअभियंता विभागाकडून सुरू झाली आहे.
अनेकदा एखादी जलवाहिनी जुनी किंवा जास्त गंजलेली असतानाही या कॅमेऱ्यामुळे त्या जलवाहिनीचे काम हाती घेणे आवश्यक असल्याचा इशारा मिळतो. तसेच एरव्ही खोदकाम करून नेमकी पाण्याची गळती न सापडण्याचा धोकाही या कॅमेऱ्याच्या वापरामुळे टळतो. त्यामुळेच जलवाहिनीतील पाणी काढून टाकून त्याठिकाणी या कॅमेऱ्याचा वापर गळतीचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी होतो. परिणामी दुरुस्तीचे नेमके ठिकाण शोधून काढणे आणि त्याठिकाणी दुरुस्ती करणे शक्य होते.
महापालिकेचा कॅमेरा झाला नादुरुस्त
जलअभियंता विभागाकडे याआधीही अशा स्वरूपाचा स्वतःच्या मालकीचा कॅमेरा होता. त्याची हाताळणी करण्याचे प्रशिक्षण हे विभागातील कर्मचाऱ्यांकडे आहे. परंतु गेल्या अनेक वर्षात हा कॅमेरा वापर आणि देखभाल दुरुस्तीनंतर आता वापरण्याजोगा राहिलेला नाही. परिणामी २ वर्षांच्या कालावधीसाठी कॅमेरा करारान्वये वापरासाठी घेण्याचा निर्णय जल अभियंता विभागाने घेतला आहे. या कराराच्या कालावधीत कॅमेऱ्याच्या देखभालीची जबाबदारी सेवा पुरवठादार कंपनीची असणार आहे. तर पालिकेच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून या कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे. दरम्यान भविष्यात आणखी नवीन तंत्रज्ञान असणाऱ्या कॅमेरा विकत घेण्यासाठी हा विभाग विचाराधीन आहे. देशात अशा प्रकारच्या कॅमेऱ्याचा वापर करणाऱ्या खूपच कमी संस्था आहेत, त्यापैकी एक आपली मुंबई महानगरपालिका आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community