तुम्ही कुठेही फिरताना टॅक्सीने जरूर फिरला असाल पण हेलिकॉप्टर टॅक्सीने कधी फिरला आहात का… उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील पर्यटन स्थळांना हेलिकॉप्टर टॅक्सी सर्व्हिसद्वारे जोडण्याची तयारी सुरू केली आहे. योगी सरकार लवकरच आग्रा ते मथुरा दरम्यान हेलिकॉप्टर टॅक्सी सुरू तयारीत आहे. त्यामुळे पर्यटक आग्रा-मथुरा पर्यटन स्थळांदरम्यान हेलिकॉप्टरने फिरू शकणार आहेत.
योगी सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मथुरा आणि आग्रा येथील हेलिपोर्टचे बांधकाम, संचालन आणि देखभाल यासाठी निविदा मागवल्या आहेत. यामध्ये असे म्हटले की, ३१ मे रोजी दुपारी १२ वाजता लखनऊ येथील पर्यटन विभागाच्या कार्यालयात प्री-बिड आयोजित केली जाणार आहे. तसेच आरएफक्यू सबमिट करण्याची तारीख २३ जून निश्चित करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, मथुरा आणि आग्रा हेलिपॅडचे बांधकाम पीपीपी तत्त्वावर केले जाणार आहे. सर्वात कमी बोली लावणाऱ्या कंत्राटाला हेलिपॅड बांधण्याबरोबरच ऑपरेशन आणि देखभालीचे काम देण्यात येणार आहे.
अवघ्या काही मिनिटांत होणार आग्रा ते मथुरा प्रवास
हेलिकॉप्टर टॅक्सी सुरू झाल्यानंतर आग्रा-मथुरादरम्यानचा प्रवास काही मिनिटांत करता येणार आहे. पर्यटक एका दिवसात अनेक ठिकाणांना भेट देऊ शकणार आहेत. यासोबतच पर्यटनाला चालना मिळणार आहे. याआधी पर्यटन विभागाने गोवर्धन परिक्रमेसाठी हेलिकॉप्टरचा वापर केला होता आणि जे पर्यटक फिरू शकत नव्हते, त्यांनी हेलिकॉप्टर टॅक्सीने प्रवास केल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community