गोवरची बाधा झालेल्या बालकांचे लसीकरणच अपूर्ण, मनुष्यबळासाठी आता इंटर्न्सचीही मदत

मुंबईत गोवंडीत गोवरची साथ मोठ्या प्रमाणात पसरत असताना बाधित बालकांचे लसीकरणच झालेले नसल्याने पालिका आरोग्य खात्याची लसीकरण मोहिम अयशस्वी झाल्याचे उघडकीस झाले आहे. कित्येक बालकांना बीसीजी ही लसही मिळालेली नसल्याचे आरोग्यसेविकांच्या पाहणीतून दिसून आले आहे. मुंबईभरात लसीकरण मोहिम राबवून गोवरप्रतिबंधक लस राबवताना आता वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्न्सचीही मदत घेतली जाणार आहे. पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ संजीव कुमार यांनी गुरुवारी सकाळी तातडीची बैठक बोलावून इंटर्न्सनाही लसीकरण मोहिमेत सामील करण्याचे निर्देश अधिष्ठातांना दिले.

रोगराईचे साम्राज्य पसरलेल्या गोवंडीत ५४ बालकांना गोवरची बाधा झाली आहे. तर सहा बालकांचा गोवरने संशयित मृत्यू झाला आहे. राजावाडी रुग्णालयात गोवरबाधित बालकाचा मृत्यू झाल्यानंतर पालिका आरोग्य विभागाला जाग आली. त्यावेळी बाधित तसेच संशयित रुग्णांना शोधण्यासाठी पालिका आरोग्य विभागाने आता मनुष्यबळाची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे. गोवरचा संसर्ग वाढलेल्या आठ विभागात ४७० आरोग्यसेविकांना नियुक्त केलेले असताना प्रत्यक्षात त्यांना दैनंदिन कामासह गोवरच्या रुग्णांचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे कामाचे वाटप तसेच इतरत्र केंद्रीय व राज्य सरकारची कामे सांभाळून गोवरबाधित रुग्ण शोधणे हे फारच आव्हानात्मक असल्याचे गोवंडी भागांत काम करणा-या आरोग्यसेविकांनी सांगितले.

लसीकरण मोहिमेच्याच वेळी आम्ही गोवरची साथ पसरलेल्या भागांत पाहणी केली. बाधित रुग्णांची माहिती मिळवली, या रुग्णांनी मूलभूत लसीकरणही पूर्ण केलेले नाही. बरीच मूले कमी वजनाची असल्याची माहिती मिळाली. पालिका आरोग्य अधिका-यांनी मात्र याबाबतील अधिकृत माहिती आकडेवारी मिळाल्यावर देतो, असे सांगितले. गोवंडीतील बाधित रुग्णांमध्ये ५० टक्के लसीकरण पूर्ण झालेले आहे. तर काही रुग्णांनी गोवर प्रतिबंधात्मक लसीची पहिलीच मात्रा घेतल्याचे अधिका-यांनी सांगितले. सतत वरिष्ठांकडून बैठका सुरु असल्यानेच अधिकृत आकडेवारी नंतर देऊ, अशी माहिती अधिका-यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here