आपत्कालीन साखळी ओढून ट्रेन थांबवणाऱ्याचा शोध घेत असताना, रेल्वे सुरक्षा बलाच्या हाती एक महिला गॅंग लागली आहे. ही महिला गॅंग दारूच्या तस्करीसाठी ट्रेनची आपत्कालीन साखळी ओढून, ट्रेन थांबवत होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या 12 जणांच्या महिला टोळीला रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून दीड हजार दारूच्या बॉटल्सचा साठा जप्त केला आहे.
असा लागला शोध
पश्चिम रेल्वे मार्गावरील वापी आणि बागवारा या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मागील काही महिन्यापासून पॅसेंजर ट्रेनची विनाकारण आपत्कालीन साखळी ओढण्याच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे ट्रेनला उशीर होत होता. त्याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. विनाकारण साखळी ओढण्याच्या घटनेत वाढ झाल्यामुळे याचा शोध लावण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाकडे जवाबदारी सोपवण्यात आली होती. विनाकारण साखळी ओढणा-यांचा शोध सुरु असताना, रेल्वे सुरक्षा बलाच्या हाती एक महिलांची टोळी लागली. रेल्वे सुरक्षा बलाने संशयावरून या महिला टोळीला ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे असणाऱ्या सामनाची तपासणी केली असता, त्यात 1 हजार 536 दारूच्या बॉटल्स सापडल्या.
( हेही वाचा :कर्नाटकातील हिजाब प्रकरण पेटले, मुंबईतही पडसाद )
अशी लढवत होत्या शक्कल
12 जणांच्या या महिला ग्रुपची रेल्वे पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी ट्रेन थांबवण्यासाठी आम्हीच आपत्कालीन साखळी ओढत असल्याची कबुली दिली. दारूची आयात निर्यात करण्यासाठी आम्ही दोन स्थानकांनामध्ये रात्रीच्या वेळी साखळी ओढून गाडी थांबवत होतो. एक महिला वापी येथून ट्रेनमध्ये चढून, वापी स्थानकातून गाडी सुटताच ठरलेल्या वेळेत ती साखळी ओढत असे, त्यानंतर ट्रेन थांबताच इतर महिला अवैध दारूचे बॉक्स घेऊन ट्रेनमध्ये चढत होत्या. अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या महिला वापी येथून दारूचे बॉक्स घेऊन, वापी आणि बागवारा या दोन रेल्वे स्थानकांच्या दरम्यान दारूच्या बॉक्सची तस्करी करत होत्या. हे बॉक्स एका निर्जन ठिकाणी ट्रेन थांबवून उतरवले जात होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या महिलांकडून सुमारे 70 हजार किमतीचा अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला असून, या महिलांची कोविड चाचणी करून त्यांचा ताबा लोहमार्ग पोलिसांना देण्यात आला असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community