महेश मांजरेकर यांचा ‘नाय वरण भात लोंचा, कोन नाय कोंचा’ हा सिनेमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आला आहे. या सिनेमात अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप करत भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील पोक्सो न्यायालयात याचिका दाखल करत महेश मांजरेकर यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
लहान मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवली
गिरणी कामगारांच्या जीवनावर तयार करण्यात आलेला महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरण भात लोंचा, कोन नाय कोंचा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. महिला आयोगाच्या तक्रारीनंतर या चित्रपटातील काही आक्षेपार्ह सीन्स काढून अखेर दोन आठवड्यापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र या चित्रपटात १४ ते १५ वयोगटातील मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्या प्रकरणी भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी माहीम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र मुंबई पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा दाखल न केल्यामुळे अखेर सीमा देशपांडे यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या पोक्सो न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली आहे.
(हेही वाचा भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण)
चित्रपटाचे प्रदर्शन तातडीने थांबवण्याची मागणी
‘नाय वरण भात लोंचा, कोन नाय कोणचा’ या सिनेमात अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप करत आयपीसी कलम १५६ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी याचिकेत करण्यात आली. या याचिकेवर सोमवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. तसेच या चित्रपटाचे प्रदर्शन तातडीने थांबवण्याची मागणी देखील करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातही याचिका दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण पोक्सो कायदा अंतर्गत येत असल्यामुळे तसेच याचा वाद पोक्सो न्यायालयात गेल्यामुळे महेश मांजरेकर यांच्यासह चित्रपट निर्मात्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Join Our WhatsApp Community