परमबीर सिंगांच्या मागे चौकशीचा ससेमिरा वाढला

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारे माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्याकडून तसेच विविध तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगासमोरही त्यांना हजर रहावे लागणार आहे. शुक्रवारी सिंग यांनी महानगर न्यायदंडाधिकारी यांच्याकडे त्यांना ‘फरार’ घोषित केले होते, ती नोटीस मागे घेण्यासाठी अर्ज केला आहे

२३१ दिवस गायब राहिल्यावर परमबीर सिंग गुरुवारी मुंबईत दाखल झाले आणि थेट गुन्हे शाखेसमोर चौकशीला हजर राहिले. कांदिवली येथे गुन्हे शाखेच्या कार्यालयात दिवसभर चौकशीला सामोरे गेल्यानंतरही सिंग यांच्यामागे शुक्रवारीही चौकशीचा ससेमिरा सुरूच होता. गुन्हे शाखेच्या चौकशीत परमबीर यांनी सहकार्य केले मात्र एका दिवसाच्या चौकशीवर गुन्हे शाखा समाधानी नाही. लवकरच परमबीर यांना पुन्हा बोलवले जाईल, मात्र शुक्रवारी त्यांना गुन्हे शाखेकडून दिलासा दिला आहे. सचिन वाझेच्या स्टेटमेंटनुसार गुन्हे शाखेच्या तपासात बॉस नंबर 1 म्हणजे परमबीर आहे, असे समोर आले होते. या आरोपावर परमबीर सिंग यांना विचारले असता मला कोण कोणत्या नावाने हाक मारतात याबद्दल मला काहीही माहिती नाही, असे उत्तर दिले.

(हेही वाचा 26/11…अफगाणिस्तानातील अमेरिकेची बेवारस शस्त्रास्त्रे भारतासाठी धोकादायक)

चांदीवाल आयोगासमोर हजर रहावे लागणार 

परमबीर सिंग यांना शुक्रवारी चांदीवाल आयोगासमोर उपस्थित रहावे लागण्याची शक्यता आहे. आयोगाने त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केला होता. त्यामुळे आज त्यांनी आयोगाच्या चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान सिंग यांनी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात त्यांना फरार घोषित करण्यात आले, तो आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी अर्ज दाखल केला आहे. गोरेगावच्या ज्या गुन्ह्यात परमबीर सिंग हे चौकशीला हजर झाले, त्याच गुन्ह्यात त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. दरम्यान परमबीर सिंग यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. यासाठी सिंग यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहावे लागेल अन्यथा वकिलांच्या माध्यमातून ही ऑर्डर रद्द होऊ शकते.

ठाणे नगर पोलिस ठाण्यात चौकशी सुरु 

परमबीर सिंग शुक्रवारी सकाळीच आपल्या वकिलासह ठाण्यात दाखल झाले. ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात सिंग हे एक आरोपी असून या प्रकरणात सिंग यांना ठाणे नगर पोलिसांनी समन्स जारी केले होते. ठाणे नगर पोलिसांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती. डीसीपी अविनाश अंबुरे हे परमबीर सिंग यांची चौकशी करणार आहे. क्रिकेट बुकीं सोनू जलान याने ठाणे नगर पोलिस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात सिंग यांच्याकडे चौकशी होणार करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here